नरेंद्र कुकडे
हिंगणा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण नियंत्रित असले तरी हिंगणा तालुक्यात बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तालुक्यात असलेले दोन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) कोरोनाच्या सर्वाधिक फैलावाला कारणीभूत ठरले आहेत. १ डिसेंबरला तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३,५८२ इतकी झाली. यातील ३,३५१ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ८२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील नीलडोह, डिगडोह (देवी), इसासनी, न.प. वानाडोंगरी व टाकळघाट या गावांमध्येच सर्वाधिक संक्रमण होताना दिसत आहे. ही गावे हिंगणा व बुटीबोरी एमआयडीसी परिसरात मोडतात. देशातील विविध राज्यातील हजारो कामगार व कर्मचारी येथे रोजगारासाठी येतात. सुरुवातीला तपासणीची सक्ती नसल्याने येथे संक्रमण अधिक वाढले. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढली.
अशा करण्यात आल्या उपाययोजना
१. तालुक्यात कोरोना संक्रमण नियंत्रित करण्यासाठी नऊ शासकीय व तीन खासगी टेस्टिंग सेंटर निर्माण करण्यात आले.
२. बाधित परिसरातील कुटुंबातील सदस्यांची निरंतर सर्वेक्षणातून माहिती ठेवण्यात आली.
३. तालुकास्तरावर कोविड सेंटर बनविण्यात आले. यासोबतच लता मंगेशकर रुग्णालय, शालिनीताई मेघे व लोटस पॅथालाॅजी येथेही तपासणी केंद्र तयार करण्यात आले.
४. नागरिकांची जनजागृती करून विनामास्क वावरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला.
------------
दोन औद्योगिक क्षेत्रामुळे हिंगण्यात कोरोनाचे संक्रमण अधिक झाले. आता बाधित रुग्ण मिळाले तर होमआयसोलेशन करून उपचार सुरू केले जातात. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशा रुग्णांची कोविड सेंटर येथे व्यवस्था केली जाते. सर्वाधिक बाधित परिसरात सर्वेक्षणाचे कार्य निरंतर सुरू आहे. संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
डॉ. प्रवीण पडवे, तालुका वैद्यकीय अधिकारी, हिंगणा