कोरोनाने मांडला डाव, लग्नासाठी चातुर्मासाचेही वाढले भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:30+5:302021-07-18T04:07:30+5:30
- शास्त्रार्थाच्या तोडग्यातून काढले जात आहेत पर्यायी मुहूर्त प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय पंचांगानुसार आषाढ ...

कोरोनाने मांडला डाव, लग्नासाठी चातुर्मासाचेही वाढले भाव !
- शास्त्रार्थाच्या तोडग्यातून काढले जात आहेत पर्यायी मुहूर्त
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय पंचांगानुसार आषाढ मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून (देवशयनी एकादशी) चातुर्मास प्रारंभ होतो आणि कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला (प्रबोधिनी स्मार्त एकादशी) चातुर्मासाचा समारोप होतो. या काळात देव निद्राधीन असताना असा एक समज आहे. देवाच्या साक्षीने शुभकार्ये व्हावीत, अशी मनोमनी भावना असते आणि म्हणूनच या काळात विवाहादी कोणतीही शुभकार्ये टाळली जातात. ही परंपरा आजही भारतीय जनमानसात रुजलेली आहे. मात्र, व्यस्तता, दूरवर निर्माण झालेले नातेसंबंध, वैज्ञानिक उकल, शास्त्रार्थ आदींच्या तोडग्यातून विवाहादी शुभकार्यासाठी चातुर्मासह उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे.
पाच महिने आणि चातुर्मास कसे?
म्हणायला चातुर्मासात आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन व कार्तिक या पाच महिन्यांचा समावेश होतो. आषाढ मासातील सुरुवातीचे दहा दिवस चातुर्मासात गणले जात नाहीत आणि कार्तिक महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस चातुर्मासात गणले जातात. हे दोन्ही महिन्यांतील अर्धे-अर्धे दिवसाचा एक मास मिळून चातुर्मासाची गणती पूर्ण होत असते.
चातुर्मासातील शुभ मुहूर्त (आपात्कालीन)
ऑगस्ट - १०, ११, १४, १८, २०, २१, २६, २७ (८ मुहूर्त)
सप्टेंबर - १६ (१ मुहूर्त)
ऑक्टोबर - ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१, २४ (९ मुहूर्त)
मंगल कार्यालये बुक
शहरात सध्या दुपारी ४ वाजतानंतर लॉकडाऊन आहे. तरी विवाहादी कार्ये मंगल कार्यालये व हॉटेल्समध्ये संध्याकाळी पार पाडत होती. दरम्यान मनपा प्रशासनाने कारवाई केल्याने आता मंगलकार्यालये दुपारी ४ वाजेनंतरच्या कोणत्याही कार्यक्रमांना स्वीकारत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सकाळच्या मुहूर्ताचे विवाहसोहळे मर्यादित संख्येत मंगल कार्यालयांमध्ये पार पाडली जात आहेत. स्वागत समारंभ मात्र मंगल कार्यालयांमध्ये होताना दिसत नाहीत.
परवानगी ५० आमंत्रितांचीच
राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने कोणत्याही जाहीर आयोजनास अद्याप परवानगी दिलेली नाही. आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणून विवाह सोहळ्यांना केवळ ५० आमंत्रितांची परवानगी दिली आहे. त्यानुसार अनेक जण घरगुती सोहळे साजरे करत असल्याचे दिसून येते. निमंत्रणामध्ये हळदीचे जेवण, विवाहाचे जेवण आणि स्वागत समारंभाचे जेवण अशी गटवारी करून मर्यादित लोकांना आमंत्रित केले जात असल्याचे दिसून येत आहे.
पर्जन्य काळात मुहूर्त न काढणे, ही शिकवण
आषाढ मासापासून भारतात पर्जन्यकाळ सुरू होतो. पूर्वीच्या काळी पावसाळ्यात विवाह सोहळ्याचे आयोजन कठीण होत असते. वाहतूक व्यवस्था उत्तम नव्हती आणि अनेक अडचणींमुळे पंचांगकर्त्यांनीच सर्वसामान्यांच्या सोयीसाठी चातुर्मासात विवाह मुहूर्त, वास्तू मुहूर्त काढू नये, असे सांगितले गेले. यात वैज्ञानिक किंवा अवैज्ञानिक असा विषय नाही. आता मात्र, सगळ्या सोयी असल्याने आणि अनेक पर्याय असल्याने या काळात विवाहमुहूर्त काढले जात आहेत. शिवाय, भौगोलिकदृष्ट्या पंचांगही वेगवेगळे असते. उत्तर भारतात चातुर्मासात शुभ कार्य होत नाही तर दक्षिण भारतात होतात. हा दूरवर नातेसंबंध पसरत असल्याचाही एक परिणाम म्हणून बघता येईल.
- डॉ. अनिल वैद्य, ज्योतिषाचार्य
बालविवाह आता होत नाहीत
पूर्वीच्या काळी अष्टवर्षात्मक अर्थात बाल विवाह मोठ्या प्रमाणात होत असत. बालकांना हा चातुर्मास (पावसाळा) घातक असतो, अशी मानना आहे. त्यातच बालकांना पावसाळ्यात अनेक धोके आढळतात. तत्कालीन परिस्थितीनुरूप हा विचार करावा. शुभकार्यात कोणतेही विघ्न नकोत म्हणून या काळात हे मुहूर्त टाळले जात. आता वयस्क वयात विवाह होतात आणि अन्य सुविधाही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आषाढ म्हणा वा चातुर्मास विवाहासाठी अडसर ठरत नाहीत.
- मनोज हातूलकर गुरुजी, पुरोहित
.......................