कोरोनामुळे ग्राहक घरात ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:49+5:302021-03-04T04:12:49+5:30

नागपूर : कोरोना संक्रमणापासून स्वत:ला वाचविण्यासाठी ग्राहक घरात ‘लॉक’ झाल्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये नागपूर जिल्हा (शहर क्षेत्र) ...

Corona locks customer home | कोरोनामुळे ग्राहक घरात ‘लॉक’

कोरोनामुळे ग्राहक घरात ‘लॉक’

नागपूर : कोरोना संक्रमणापासून स्वत:ला वाचविण्यासाठी ग्राहक घरात ‘लॉक’ झाल्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये नागपूर जिल्हा (शहर क्षेत्र) व अतिरिक्त जिल्हा (ग्रामीण क्षेत्र) ग्राहक तक्रार निवारण आयोगात कमी तक्रारी दाखल झाल्या. सदर दोन्ही आयोग मिळून ग्राहकांनी २०१९ मध्ये १०९३ तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु, २०२० मध्ये केवळ ९०१ तक्रारी दाखल करण्यात आल्या.

गेल्या वर्षी भारतामध्ये मार्च महिन्यात कोरोना रुग्ण आढळण्याला सुरुवात झाली. त्यानंतर रुग्णसंख्या सतत वाढत गेल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित करून अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित व्यवस्थेच्या चाकांना ब्रेक लावला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने स्वत:सह इतर सर्व न्यायालयांमध्ये केवळ तातडीच्या व महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्याचे आदेश जारी केले. परिणामी, मार्चपासून जिल्हा ग्राहक आयोगात तातडीची व महत्त्वाची कामे वगळता इतर सर्व कामे थांबविण्यात आली. ग्राहकांनीही आवश्यक नसलेल्या कामासाठी घराबाहेर पडणे बंद केले. त्यामुळे नागपुरातील जिल्हा व अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी कमी प्रकरणे दाखल झाली. तसेच, प्रकरणे निकाली निघण्याची संख्याही कमी झाली. दोन्ही आयोगांनी २०१९ मध्ये २२१ प्रकरणे निकाली काढली होती. २०२० मध्ये त्यांना केवळ ३१ प्रकरणे निकाली काढता आली.

---------------

सर्वाधिक तक्रारी बिल्डरविरुद्ध

दोन्ही आयोगांमध्ये सर्वाधिक तक्रारी बिल्डर व डेव्हलपर्सनी केलेल्या फसवणुकीविरुद्ध दाखल झाल्या. या तक्रारी ६० टक्क्यांवर आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विमा दाव्यासंदर्भातील तर, तिसऱ्या क्रमांकावर बँकिंगविषयीच्या तक्रारी आहेत. या तक्रारी ७ ते ८ टक्के आहेत. याशिवाय वीज, वित्त, पर्यटन, कृषी, ऑटोमोबाईल व इतर विविध क्षेत्राशी संबंधित तक्रारीही दाखल झाल्या आहेत.

----------------

वर्षनिहाय दाखल प्रकरणे

वर्ष - जिल्हा आयोग - अतिरिक्त आयोग

२०११ - ८३९ - १३९

२०१२ - ८९१ - २२०

२०१३ - ८६३ - २०९

२०१४ - ६८६ - ३०१

२०१५ - ८५२ - ७६२

२०१६ - ८०० - १२५७

२०१७ - ६१७ - २३५

२०१८ - ७६५ - २५७

२०१९ - ७५४ - ३३९

२०२० - ६१९ - २८२

-----------------

एकूण दाखल व निकाली तक्रारी

वर्ष - दाखल - निकाली

२०१९ - १०९३ - २२१

२०२० - ९०१ - ३१

----------------

कोरोनामुळे तक्रारी कमी झाल्या

गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे ग्राहक आयोगाचे काम काही महिने बंद होते. त्यानंतर मर्यादित स्वरूपात कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळीही विविध बंधने लागू होती. त्यामुळे ग्राहक घराबाहेर पडत नव्हते. कोरोनापासून स्वत:ला वाचविण्याला सर्वांची प्राथमिकता होती. परिणामी, ग्राहक आयोगात दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या कमी झाली.

------- अविनाश प्रभुणे, सदस्य, अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग.

Web Title: Corona locks customer home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.