मेडिकल व डेंटलच्या १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:08 IST2021-02-16T04:08:57+5:302021-02-16T04:08:57+5:30

नागपूर : वाढत्या कोरोनाचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. मेडिकल व डेंटलच्या १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सोमवारी ...

Corona infection in 12 medical and dental students | मेडिकल व डेंटलच्या १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

मेडिकल व डेंटलच्या १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नागपूर : वाढत्या कोरोनाचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. मेडिकल व डेंटलच्या १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सोमवारी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचे वसतिगृहच हॉटस्पॉट ठरू पाहत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. तूर्तास सर्व विद्यार्थ्यांना मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये भरती केले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मागील दोन आठवड्यांपासून नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नऊ वसाहती कोरोनाच्या हॉटस्पॉट झाल्याची कबुली स्वत: मनपा आयुक्तांनी दिली. याच धर्तीवर आता मेडिकल व डेंटलचे वसतिगृहही हॉटस्पॉट ठरू पाहत तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मागील दोन वर्षांपासून मेडिकलच्या ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमासाठी २५०, तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) ‘बीडीएस’ अभ्यासक्रमाला ५६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दोन्ही महाविद्यालयांचा ऑल इंडियाचा म्हणजे बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांचा १५ टक्के कोटा असतो. यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे दोन्ही महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया उशिरा झाली. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांना आरटीपीसीआर चाचणी करूनच वसतिगृहात प्रवेश देण्यात आला; परंतु बाहेरील राज्यातील काही विद्यार्थी ये-जा करीत असल्याने किंवा त्यांच्या भेटीला कोणी येत असल्याने धोका वाढला आहे. यातच २ फेब्रुवारीपासून दोन्ही महाविद्यालयांचे वर्ग सुरू झाले. यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे. संशय व्यक्त केला जात असतानाच मागील आठवड्यापासून सर्दी, खोकला व ताप असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. शनिवारी तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमधून मेडिकलच्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील ८, तर बीडीएसचे ४ असे एकूण १२ विद्यार्थ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना लागण वसतिगृहातून झाली, वर्गातून झाली की कोणा बाहेरील व्यक्तीकडून याचा शोध घेतला जात आहे; परंतु पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने दोन्ही महाविद्यालयांनी खबरदारीची उपाययोजना घेणे सुरू केले आहे.

-सर्वांची प्रकृती स्थिर

मेडिकल व डेंटलचे मिळून १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. लागण कुठून झाली याचाही शोध घेतला जाईल.

-डॉ. अविनाश गावंडे

वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

Web Title: Corona infection in 12 medical and dental students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.