कोरोनामुळे पालक धास्तीत : विद्यार्थी सर्वाधिक समूहाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:32 PM2020-03-13T23:32:55+5:302020-03-13T23:54:22+5:30

कोरोना व्हायरस टाळण्यासाठी गर्दी टाळा असा सल्ला दिला जात आहे. पण सर्वाधिक गर्दी होणारे ठिकाण म्हणजे शाळा आहेत. येथे होणारी गर्दी ही चिमुकल्यांची आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्यांपेक्षा कमी असल्याने मुलांना शाळेत पाठविताना पालकांची भीती वाढली आहे.

Corona Fears Parenting: The Most of Students clutch of Group | कोरोनामुळे पालक धास्तीत : विद्यार्थी सर्वाधिक समूहाच्या विळख्यात

कोरोनामुळे पालक धास्तीत : विद्यार्थी सर्वाधिक समूहाच्या विळख्यात

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण विभागाने दिल्या जनजागृतीच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरस टाळण्यासाठी गर्दी टाळा असा सल्ला दिला जात आहे. पण सर्वाधिक गर्दी होणारे ठिकाण म्हणजे शाळा आहेत. येथे होणारी गर्दी ही चिमुकल्यांची आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्यांपेक्षा कमी असल्याने मुलांना शाळेत पाठविताना पालकांची भीती वाढली आहे.
शहरातील बहुतांश शालेय विद्यार्थी स्कूल बस अथवा ऑटोने शाळेत जातात. त्यामुळे प्रवासातच गर्दीचा सामना करावा लागतो आहे. शाळेत गेल्यानंतर प्रार्थनेच्या वेळी सर्व विद्यार्थी एकत्र गोळा होतात. वर्गातही ४० ते ५० विद्यार्थ्यांचा समूह असतो. विद्यार्थी हे समूहानेच भोजन करतात. त्यामुळे विद्यार्थी हा सर्वात जास्त समूहाच्या संपर्कात येतो. समूहामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वाढू शकतो अशी भीती असल्याने पालकांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण आहे. सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला असेल तरी शाळांना सुट्टी मारण्यास विद्यार्थीच धजावत नाही. परीक्षा असल्याने पालकांचीही मानसिकता परीक्षेच्या काळात या छोट्यामोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करण्याची असते.
दुसरीकडे शाळांमध्ये फक्त जनजागृती करण्यात येत आहे. शिक्षण विभागानेसुद्धा कोरोनाचा धोका लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासंदर्भातच पत्र पाठविले आहे. पण शाळांनीही काही उपाययोजना कराव्या, परीक्षेच्या काळात विद्यार्थी आजारी असेल तर त्याचे वर्ष वाया जायला नको, असे कुठलेही निर्देश दिलेले नाही. शहरातील काही मोठ्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सॅनिटायझर शाळेत ठेवले आहे.

भीती आहे पण पर्याय नाही
निरजा पाटील या म्हणाल्या की मुलीला सर्दी आणि थोडी कणकण आहे. पण परीक्षेचे दिवस असल्याने शाळेत पाठविणे गरजेचे आहे. कोरोनाची भीती तर आहे पण पर्यायही नाही ना!

पालक म्हणून उपाययोजना करतो आहे
मकरंद ठाकरे म्हणाले की सामान्यपणे या व्हायरपासून बचाव करण्यासाठी ज्या सूचना मिळत आहेत त्याचे पालन करीत आहे. मुलाला सॅनिटायझर, तोंडाला रुमाल बांधून पाठवित आहे. आता शाळेत मुले ते कसे वापरतात, शाळा मुलांची कितपत काळजी घेते यावरही निर्भर आहे.

शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना हॅण्ड वॉश उपलब्ध करून दिले आहे. पालकांनाही सांगितले आहे की, विद्यार्थी आजारी असेल तर त्याला डॉक्टरकडे न्या. मुलांच्या पेपरची काळजी करू नका. तो बरा झाला की, पेपर पुन्हा घेता येईल. त्याचबरोबर प्रार्थनेच्या काळातसुद्धा आम्ही मुलांमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या बाबतीत जनजागृती करीत आहोत.
राजाभाऊ टांकसाळे, संचालक, सेंट पॉल स्कूल.

शाळांनी पर्याप्त व्यवस्था करावी
आरटीई अ‍ॅक्शन कमिटीने शिक्षण उपसंचालकांना कोरोना व्हायरसपासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळांनी पर्याप्त व्यवस्था करावी, यासंदर्भात निवेदन दिले आहे. पालकांमध्ये कोरोनाची भीती पसरली आहे. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमावली तयार करावी. शाळेनी हॅण्ड वॉश,सॅनिटायझर तसेच प्राथमिक उपचाराची व्यवस्था व्हावी. शाळांनी मुलांना २० ते २५ दिवसांची सुट्टी द्यावी, जेणेकरून विद्यार्थी सुरक्षित राहतील.

Web Title: Corona Fears Parenting: The Most of Students clutch of Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.