कोरोनामुळे नागपुरातील वृक्षगणनेत विघ्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:57 IST2020-06-13T10:55:25+5:302020-06-13T10:57:20+5:30
नागपूर शहरात मागील नऊ वर्षात वृक्षगणना झालेली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार वृक्षगणना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोविड-१९ मुळे याहीवर्षी वृक्षगणनेत विघ्न आले आहे.

कोरोनामुळे नागपुरातील वृक्षगणनेत विघ्न!
गणेश हूड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनयम १९७५ च्या तरतुदीनुसार दर पाच वर्षांनी वृक्षगणना होणे अपेक्षित आहे. परंतु नागपूर शहरात मागील नऊ वर्षात वृक्षगणना झालेली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार वृक्षगणना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आधुनिक पद्धतीने वृक्षगणना केली जाणार होती. मात्र कोविड-१९ मुळे याहीवर्षी वृक्षगणनेत विघ्न आले आहे. यासाठी पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
देशभरातील हिरव्यागार शहरात नागपूरचा समावेश होतो. परंतु शहरातील वृक्षसंवर्धन व वृक्षगणना यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद केली जात नाही. उद्यान विभागात मनुष्यबळ नाही. अशा अडचणीमुळे वृक्षगणना करता आलेली नाही.
२०११ मध्ये झालेल्या गणनेनुसार नागपूर शहरात २१ कोटी ४३ लाख ८३६ झाडे होती. म्हणजे प्रत्येक १० व्यक्तींसाठी नऊ झाडे होती. शहरातील झाडांची संख्या विचारात घेता वृक्षगणनेसाठी सधारणत: चार महिन्यांचा कालावधी लागतो. गेल्या मार्च महिन्यात याला सुरुवात केली जाणार होती. मात्र कोविड-१९ मुळे गणना करण्याचे काम पुढे ढकलण्यात आले. आता ती पुढील वर्षात हाईल, अशी माहिती उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. तसेच शेकडो झाडे वाळली. यामुळे सध्या नागपूर शहरात किती झाडे आहेत, हे वृक्षगणनेनंतरच स्पष्ट होणार आहे. बांधकाम वा विकास कामांसाठी झाडे तोडावयाची असल्यास एका झाडाच्या बदल्यात संबंधित व्यक्तीने पाच झाडे लावणे आवश्यक आहे. याची हमी मिळाल्यानंतरच झाडे तोडण्याला परवानगी दिली जाते. त्यानुसार मागील ९ वर्षात १६ हजार झाडे लावणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात हजाराच्या आसपास झाडे लावण्यात आली.
४०.३३ कोटी मिळण्याची शक्यता कमीच
नागपूर शहरात मनपाची १३१ तर नासुप्रची ४६ उद्याने आहेत. नाल्याच्या काठावरील उद्यानांसाठी नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून वापरण्याचे प्रस्तावित आहे. नासुप्रची मनपाकडे हस्तांतरित होणाऱ्या उद्यानांची देखभाल करावी लागणार आहे. आयुक्तांच्या अर्थसंकल्पात २०२०-२१ या वर्षात उद्यान विभागासाठी ४०.३३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. परंतु आर्थिक स्थितीचा विचार करता हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.
वृक्षगणना पुढील वर्षात
मनपाने वृक्षगणनेसाठी नियोजन केले होते. ही प्रक्रिया सुरू करणार होतो. परंतु कोविड-१९ मुळे मार्च महिन्यापासून कामावर परिणाम झाला आहे. परिस्थितीचा विचार करता पुढील काही महिने गणना शक्य नाही. आता ती पुढील वर्षात करावी लागेल.
- अमोल चोरपगार, उद्यान अधीक्षक