२६ लाख खर्च करुनही रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:00+5:302021-05-25T04:08:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना रुग्णावर उपचाराच्या नावाखाली वाजवीपेक्षा अधिक रक्कम उकळल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ...

२६ लाख खर्च करुनही रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णावर उपचाराच्या नावाखाली वाजवीपेक्षा अधिक रक्कम उकळल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कोरोनाबाधित स्टेशन मास्तरवरील उपचारांसाठी नामवंत आणि चर्चेतील रुग्णालयाने तब्बल २६ लाखांहून अधिक रक्कम उकळली. या महागड्या उपचारानंतरही रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकाराने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी नागपुरात रेल्वेचे विभागीय रुग्णालय आहे. या रुग्णालयापेक्षाही अधिक चांगली सेवा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना वेळेत मिळावी, यासाठी नामांकित खासगी रुग्णालयांसोबत रेल्वेने सामंजस्य करारही केला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळमना येथील स्टेशन मास्तर बी. सी. रॉय यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना रामदास पेठेतील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी वेगवेगळ्या तपासण्या व उपचारांसाठी रुग्णालयाकडून २६.८५ लाखांचे बिल काढण्यात आले आहे. इतका अवाढव्य खर्च होऊनही रॉय यांना मृत्यूने गाठले. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळेच त्यांचा जीव गेल्याचा आरोप रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला आहे. या बिलाच्या रकमेसह संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणीही आता पुढे येऊ लागली आहे.
..........
अधिकारी - रुग्णालयांचे साटेलोटे असल्याचा आरोप
रेल्वे कर्मचाऱ्यांना करार केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस पद्धतीने उपचार मिळतो. यामुळे बिलाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. याचाच फायदा घेत रुग्णालयांकडून अधिकचे बिल उकळले जात असल्याचा आरोप यापूवीर्ही रेल्वे कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. काही रेल्वेचे अधिकारी व करार केलेल्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींचे साटेलोटे असून, ठरलेल्या टक्केवारीनुसार संपूर्ण प्रक्रिया होत असल्याचा गंभीर आरोप रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोरोना रुग्णांकडून अधिक बिलाची आकारणी झाल्यास महापालिकेकडून ऑडिट केले जाते. त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. मात्र, हे ऑडिट योग्य पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारी आहेत. अलिकडेच महापालिकेने निवृत्त डॉक्टर, निवृत्त ऑडिटर व मनपा अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. लोकांचा रोष ओढवल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आल्याने या समितीचे कामही योग्य पद्धतीने होत नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
.............
फुफ्फुसाच्या संसर्गासाठी अधिक खर्च लागतो
‘फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यास त्यावर उपचारासाठी अधिक खर्च येतो. रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येते. त्यामुळे अधिक खर्च होऊ शकतो.’
- मनिंदर उप्पल, डीआरएम, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग
.........