मनोरुग्णालयातील रुग्णाचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST2021-04-17T04:08:16+5:302021-04-17T04:08:16+5:30
आशिष दुबे/लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील ८३ मनोरुग्ण एका महिन्यात कोरोनाच्या विळख्यात आले आहेत, तर एकाचा मृत्यू ...

मनोरुग्णालयातील रुग्णाचा कोरोनाने मृत्यू
आशिष दुबे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील ८३ मनोरुग्ण एका महिन्यात कोरोनाच्या विळख्यात आले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. दोघांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण इस्पितळाचे डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिले. मात्र, उर्वरित मनोरुग्णांना कोरोना संक्रमणापासून वाचविण्यासाठी आराेग्य विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी हॉस्पिटलमधील २० मनोरुग्णांचे नमुने तपासणीस पाठविण्यात आले होते. त्यातील १२ रुग्ण संक्रमित आढळले. यासोबतच आतापर्यंत हॉस्पिटलमधील संक्रमित रुग्णांची संख्या ८३ वर पोहोचली आहे. परंतु, हॉस्पिटल प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार अन्य मनोरुग्णांना संक्रमणापासून वाचविण्यासाठी प्रभावी पावले उचलली जात आहेत. गेल्या एक महिन्यापासून प्रशासनाकडून हाच दावा केला जात आहे, तरीदेखील येथे संक्रमणाची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, मनोरुग्णांसोबतच हॉस्पिटलचे कर्मचारीही कोरोनाबाधित होत आहेत.
यापूर्वी आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार, मनोरुग्णांना कोरोना संक्रमणापासून वाचविण्यासाठी त्यांचे लसीकरण करण्यावर विचार केला जात आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडे विनंतीही करण्यात आली आहे. परंतु, त्या दिशेने अद्याप ठोस असे संकेत प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अद्यापपावेतो एकाही मनोरुग्णाला कोरोना लस मिळालेली नाही. यावरून मनोरुग्णांच्या लसीकरणाबाबत केले जात असलेले दावे फोल ठरत आहेत.