नागपूर मध्यवर्ती कारागृहात होऊ शकतो कोरोनाचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 08:31 PM2020-07-27T20:31:18+5:302020-07-27T20:32:52+5:30

राज्य सरकारने कोरोना नियंत्रणाकरिता वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि महाराष्ट्र प्रीझन मॅन्युअलचे काटेकोर पालन केले जात नसल्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

Corona blast could occur in Nagpur Central Jail | नागपूर मध्यवर्ती कारागृहात होऊ शकतो कोरोनाचा स्फोट

नागपूर मध्यवर्ती कारागृहात होऊ शकतो कोरोनाचा स्फोट

Next
ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : राज्य सरकारला नोटीस बजावली

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने कोरोना नियंत्रणाकरिता वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि महाराष्ट्र प्रीझन मॅन्युअलचे काटेकोर पालन केले जात नसल्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. त्यात न्यायालयाने राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, कारागृह पोलीस महासंचालक व नागपूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
कैदी सुनील काशीनाथ मेश्रामने ही याचिका दाखल केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कारागृहातील कैद्यांना साबण, सॅनिटायझर, मास्क इत्यादी वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. प्लास्टिक ड्रममध्ये पिण्याचे पाणी ठेवले जाते व पाणी पिण्यासाठी केवळ एक जग दिला जातो. तो जग सर्व जण वापरतात. ड्रमला झाकण लावले जात नाही. पाणी पिण्यासाठी पेले दिले जात नाही. घरून कपडे आणू दिले जात नसल्यामुळे कारागृहातील कपडे वारंवार वापरावे लागतात. कैद्यांना प्रतिबंधक गोळ्या दिल्या जात नाही. त्यांची नियमित आरोग्य तपासणी होत नाही. शारीरिक अंतराचे पालन होत नाही. त्यामुळे कारागृहात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो. सध्या येथील ३०० वर कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे, असे मेश्रामचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Corona blast could occur in Nagpur Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.