कोरोनाचे १०७६ मृत्यू, १५३०६ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:55+5:302021-07-17T04:07:55+5:30

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल १०७६ मृत्यू व १५३०६ रुग्णांची भर पडल्याने आश्चर्यव्यक्त ...

Corona 1076 deaths, 15306 patients | कोरोनाचे १०७६ मृत्यू, १५३०६ रुग्णांची भर

कोरोनाचे १०७६ मृत्यू, १५३०६ रुग्णांची भर

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल १०७६ मृत्यू व १५३०६ रुग्णांची भर पडल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे. ‘आयसीएमआर’ व ‘कोविड १९’ पार्टलमधील आकडेवारीत ताळमेळ बसविल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. नागपूर जिल्ह्यात आता रुग्णांची एकूण संख्या ४,९२,७२८ तर मृतांची संख्या १०,११५ वर पोहचली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची नोंद केंद्र शासनाच्या ‘आयसीएमआर’ व ‘कोविड-१९’ पोर्टलवर केली जाते. जिल्हा प्रशासन माहितीनुसार, जिल्हाबाहेरील ६७९४ व ८५१२ रुग्णांचे पत्ते परीपूर्ण नव्हते. यामुळे कोरोनाचा दैनंदिन नोंदीमध्ये त्यांचा समावेश होत नव्हता. परंतु आता त्याची नोंद आयसीएमआर पोर्टलवर करण्यात आल्याने १५,३०६ रुग्णांची भर पडली आहे. तसेच मृतांचा नोंदीतही वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, जिल्हाबाहेरील १९०, ग्रामीणमधील २९५ व शहरातील ५९१ असे एकूण १०७६ मृत्यूची नवी नोंद झाली आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत २०२ने वाढ

कोरोनाचा अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या गुरुवारी १११ असताना शुक्रवारी तब्बल २०२ने वाढ होऊन ३१३ झाली. यात शहरातील २३३, तर ग्रामीणमधील ७९ रुग्ण आहेत. यामुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे चित्र आहे. शिवाय, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १४,३०७ ने वाढून ४,८२,३०० झाली आहे. या दोन्ही आकडेवारीच्या घोळाबाबत मात्र जिल्हा प्रशासनाने खुलासा केलेला नाही.

पहिल्यांदाच शहरात पाच रुग्ण

कोरोनाचा दुसऱ्या लाटेने रुग्ण व मृत्यूच्या संख्येत उच्चांक गाठल्यानंतर मे महिन्यापासून या दोन्ही संख्येत घट येऊ लागली. २० जून रोजी पहिल्यांदाच शून्य मृत्यू ,तर ५ जुलै रोजी १४ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर शुक्रवारी शहरात आतापर्यंतच्या सर्वांत कमी, केवळ पाच रुग्ण आढळून आले. ग्रामीणमध्ये ४ तर जिल्हाबाहेरील १ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागपूर जिल्ह्यात १० रुग्ण व एक मृत्यूची नोंदविण्यात आले. जिल्ह्यात आज ६,६६९ तपासण्या झाल्या.पॉझिटिव्हिटीचे दर ०.१४ टक्क्यांवर आला आहे.

:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ६६६९

शहर : ५ रुग्ण व १ मृत्यू

ग्रामीण : ४ रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण :४,९२,७२८

एकूण सक्रिय रुग्ण : ३१३

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,३००

एकूण मृत्यू : १०,११५

Web Title: Corona 1076 deaths, 15306 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.