समन्वय राखण्यावर राहणार भर

By Admin | Updated: March 11, 2015 02:20 IST2015-03-11T02:20:16+5:302015-03-11T02:20:16+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला १३ मार्चपासून रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात होत आहे.

Coordination will continue to be filled | समन्वय राखण्यावर राहणार भर

समन्वय राखण्यावर राहणार भर

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला १३ मार्चपासून रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात होत आहे. या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले असून, संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा याकरिता मंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, देशाच्या विविध भागांतून संघ प्रचारक व ज्येष्ठ स्वयंसेवक रेशीमबागमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.
संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. यंदा होणाऱ्या अखिल भारतीय सभेत सरकार्यवाह (संघातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद) या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. या सभेत रिक्त जागादेखील भरण्यात येतील, तसेच संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चेहरा तरुण करण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या जागेवर दत्तात्रय होसबळे यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भय्याजी जोशी हे सत्तरीजवळ पोहोचले आहेत. होसबळे हे तुलनेने तरुण आहेत; शिवाय ते पंतप्रधान मोदी यांचेदेखील निकटवर्तीय मानण्यात येतात. जोशी यांच्याकडे सरकार व संघ यांच्यातील समन्वयाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. शिवाय विश्व हिंदू परिषदेची धुरा त्यांच्याकडे सोपवावी का, याबाबतदेखील मंथन होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी संघाच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी विविध मुद्यांवर चर्चादेखील केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संघाशी संबंधित विविध संस्थांमध्ये समन्वय वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावा यावर या सभेत भर राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या सभेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तो संघाचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात. अशा ठिकाणी केंद्र शासनाने जास्तीतजास्त लक्ष द्यावे, असा प्रतिनिधींचा सूर आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Coordination will continue to be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.