कूचबिहार हिंसेवरून राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:20+5:302021-04-12T04:07:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात ...

कूचबिहार हिंसेवरून राजकारण तापले
लोकमत न्यूज नेटवर्क
सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कूचबिहारमधील गोळीबार हा नरसंहारच असून, निवडणूक आयोगाने जिल्ह्यात नेत्यांच्या प्रवेशावर बंदी टाकली आहे. प्रवेश नाकारून आयोग तथ्य दाबत आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी लावला. तर ममता यांच्या इशाऱ््यावरूनच स्थानिकांनी सुरक्षादलांवर हल्ला केला असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
शनिवारी स्थानिक लोकांनी हल्ला केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने गोळीबार केला व त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. स्थानिक लोक जवानांच्या बंदुका हिसकवण्याचा प्रयत्न करत होते, असे म्हटले जात आहे. यावर ममता यांनी भाष्य केले. सीतलकूची येथे केंद्रीय सुरक्षारक्षकांनी मतदानादरम्यान लोकांवर जाणूनबुजून गोळीबार केला. मी १४ एप्रिल रोजी तेथे जाऊ इच्छिते. देशात अयोग्य केंद्र सरकार व अयोग्य गृहमंत्री आहेत. सीआयएसएफला स्थितीचा सामना करता येत नाही. केंद्रीय दलांमधील एक वर्ग लोकांवर अत्याचार करत आहे. पहिल्या टप्प्यापासून मी हा दावा करत आहे. मात्र कुणीही माझ्याकडे लक्ष दिलेले नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तृणमूलचे कार्यकर्ते या घटनेविरोधात राज्यभरात आंदोलन करतील. निवडणूक आयोगाने एमसीसी म्हणजेच आदर्श आचार संहितेचे नाव बदलून मोदी आचारसंहिता करावे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.
ममता मृत्यूचे राजकारण करत आहेत - शहा
शांतीपूर येथे एका रोड शो दरम्यान अमित शहा यांनी ममतांवर टीकास्त्र सोडले. ममतांच्या सल्ल्यावरून सीतलकूची येथे सुरक्षा दलांवर स्थानिकांनी हल्ला केला. मृत्यूचे ममता आता राजकारण करत आहेत. ममता याच त्या मृत्यूंसाठी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.