लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘एसीबी’कडून (अँटी करप्शन ब्युरो) सापळा रचून शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात येते. मात्र प्रत्यक्षात सापळ्यात अडकलेल्यांपैकी प्रत्यक्ष शिक्षा होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. २०१६ च्या आकडेवारीवर नजर टाकली असता पाच वर्षांत ४५ जणांना शिक्षा झाली, तर २३८ जणांची निर्दोष मुक्तता झाली. २०२० मध्ये, तर केवळ दोघांनाच तुरुंगाची हवा खावी लागली. निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता ‘एसीबी’कडून किती प्रभावीपणे प्रकरण मांडण्यात येते याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१६ ते २०२० या कालावधीतील लाच प्रकरणे, त्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी, झालेली कारवाई इत्यादीसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०२० मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये दोन जणांना शिक्षा झाली, तर १५ जण निर्दोष सुटले. २०१९ मध्ये ८ जणांना शिक्षा झाली होती व तब्बल ७१ जण निर्दोष सुटले होते. २०१६ मध्ये हाच आकडा ९ शिक्षा व ५२ जणांची निर्दोष मुक्तता असा होता.
२०२० मध्ये कारवाईचे प्रमाण मंदावले
‘एसीबी’च्या नागपूर कार्यालयातर्फे २०२० या वर्षात ८१ प्रकरणांत गुन्हे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून १४ लाख ८६ हजार ३५० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. त्यातील ७२ जण विभागाच्या सापळ्यात अडकले, तर दोन जणांवर अपसंपदेप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. इतर भ्रष्टाचार प्रकरणांत ९ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. दर महिन्याची आकडेवारी सरासरी जवळपास सात इतकी होत आहे. २०१६ पासूनच्या प्रकरणांची आकडेवारी पाहिली असता कारवाईचे प्रमाण मंदावल्याचे दिसून येत आहे.
१४ लाखांहून अधिकची रक्कम जप्त
२०२० मध्ये लाच प्रकरणांत सर्वांत जास्त ग्रामविकास व पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले. सापळ्यांत अडकलेल्यांमध्ये ग्रामविकास विभागातील १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर पोलीस विभागातील १४ जणांवर कारवाई झाली. याशिवाय महसूल विभागातील १०, वन विभागातील नऊ, नगरविकास विभागातील पाच जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४ लाख ८६ हजार ३५० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
वर्षनिहाय दाखल झालेले गुन्हे
वर्ष-गुन्हे
२०१६ - १३५
२०१७ - १२२
२०१८ - १३६
२०१९ - ११५
२०२० - ८१
निर्दोष सुटणाऱ्यांची आकडेवारी
वर्ष-शिक्षा-निर्दोष
२०१६ -९- ५२
२०१७ - १४ - ४५
२०१८ - १२ - ६५
२०१९ -८- ७१
२०२० -२- १५