३८० महाविद्यालयांच्या निकालांवर संक्रांत

By Admin | Updated: December 14, 2015 03:01 IST2015-12-14T03:01:02+5:302015-12-14T03:01:02+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ३८० महाविद्यालयांचे हिवाळी परीक्षांचे निकाल थांबविण्यात येण्याची शक्यता आहे.

Convergence on 380 colleges | ३८० महाविद्यालयांच्या निकालांवर संक्रांत

३८० महाविद्यालयांच्या निकालांवर संक्रांत

नागपूर विद्यापीठ : ‘एआयएसएचई’ला माहिती देण्यास टाळाटाळ
योगेश पांडे  नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ३८० महाविद्यालयांचे हिवाळी परीक्षांचे निकाल थांबविण्यात येण्याची शक्यता आहे. विद्यापीठाशी संलग्नित या महाविद्यालयांकडून ‘एआयएसएचई’ला (आॅल इंडिया सर्व्हे आॅन हायर एज्युकेशन) तसेच राज्य उच्च शिक्षण विभागाच्या ‘एमआयएस’ला (मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम) माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे वेळेत जर माहिती देण्यात आली नाही तर यासंदर्भात कारवाईचा इशारा नागपूर विद्यापीठाच्या ‘बीसीयूडी’ संचालकांनी दिला आहे. यामुळे महाविद्यालयांमध्ये खळबळ माजली आहे.
उच्च व तंत्रशिक्षणाचा दर्जा सातत्याने खालावला आहे. हा दर्जा खालावण्याची नेमकी कोणती कारणे आहेत, ती शोधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून ‘एआयएसएचई’ ही योजना राबविण्यात येत आहे. ‘एआयएसएचई’साठी महाविद्यालयांना सुविधा, शैक्षणिक प्रणाली, प्रशासन, परीक्षा, वित्त इत्यादीसंदर्भात निरनिराळ्या प्रकारची सखोल माहिती द्यायची आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात विद्यापीठाचे नवनियुक्त नोडल अधिकारी डॉ. धर्मेश धवनकर यांनी महाविद्यालयांना पत्र पाठवून माहिती मागविली होती. यासंबंधात जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केवळ काही महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावून माहिती दिली होती. यानंतर नोडल अधिकाऱ्यांकडून वारंवार महाविद्यालयांकडे ‘डेटा’ मागण्यात आला. परंतु वारंवार पत्र पाठवून आणि इशारे देऊनदेखील महाविद्यालयांनी ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही. वर्ष झाल्यावरदेखील विद्यापीठाशी संलग्नित ६४९ महाविद्यालयांपैकी केवळ २६९ महाविद्यालयांनीच ही माहिती पुरविली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण संचालकांनी विद्यापीठाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. माहिती न दिलेल्या ३८० महाविद्यालयांपैकी १७३ महाविद्यालयांनी केवळ ‘पोर्टल’वर नोंदणी केली आहे, परंतु परिपूर्ण माहितीच भरलेली नाही. १९७ महाविद्यालयांनी तर ‘एमआयएस’ संकेतस्थळावर २०१५-१६ या वर्षासाठी नोंदणीदेखील केलेली नाही.
या महाविद्यालयांनी लवकरात लवकर ही माहिती देण्याचे निर्देश ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. डी. के. अग्रवाल यांनी दिले आहेत. जर ही माहिती दिली नाही तर या महाविद्यालयांचे निकाल थांबविण्यात येऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. संबंधित महाविद्यालयांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयात केवळ कागदावरच सुविधा आहेत. जर खरी माहिती दिली तर महाविद्यालयावर संकट येऊ शकते, या भीतीतून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निकाल थांबविण्याचे अधिकार नाहीत
दरम्यान, काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ही विद्यापीठाची हुकूमशाही असल्याचा आरोप केला आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या संस्थेकडे माहिती पाठविली नाही, म्हणून निकाल थांबविण्याचे विद्यापीठाकडे अधिकार नाहीत, असा दावा एका नामवंत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी गोपनीयतेच्या अटीवर केला. यासंदर्भात डॉ. डी. के. अग्रवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Convergence on 380 colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.