अधिवेशन तीन आठवड्यांचे
By Admin | Updated: December 2, 2015 02:56 IST2015-12-02T02:56:10+5:302015-12-02T02:56:10+5:30
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशन यंदा तीन आठवडे चालणार आहे.

अधिवेशन तीन आठवड्यांचे
२३ तारखेपर्यंतचे कामकाज निश्चित : पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशन यंदा तीन आठवडे चालणार आहे. ७ ते २३ डिसेंबरपर्यंतचे कामकाजही निश्चित झाले झाले आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव सादर करण्यात येईल.
सोमवार ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. विधिमंडळ सचिवालयातर्फे २३ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विधान परिषद आणि विधान सभा या दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव सादर करण्यात येईल. ८ डिसेंबर रोजी अध्यादेश सभापटलावर ठेवण्यात येतील. सन २०१५-१६ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येतील. शासकीय विधेयके आणि सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव सादर केला जाईल. ९ डिसेंबर रोजी शासकीय विधेयकासह विरोधी पक्षाचा प्रस्ताव सादर केला जाईल. ११ डिसेंबरला अशासकीय ठराव होतील. १२ आणि १३ डिसेंबर रोजी सुटी राहील. १४ डिसेंबरपासून दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होईल. या दिवशी पुरवणी मागण्यांवरील चर्चा होईल. १५ डिसेंबरला पुरवणी मागण्यांवरील चर्चेचा समारोप होईल आणि सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव येईल. १६ डिसेंबरला विधानसभेत महामंडळाच्या अहवालावर चर्चा होईल. तर परिषदेमध्ये निवृत्त सदस्यांना निरोप दिला जाईल. १७ डिसेंबरला शासकीय विधेयके आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव सादर केला जाईल. १८ डिसेंबरला शासकीय विधेयके व अशासकीय कामकाज होईल. १९ डिसेंबरला बैठक होणार नाही. २० ला सुटी, २१ डिसेंबरपासून तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होईल. या दिवशी शासकीय विधेयके सादर केली जातील. २२ डिसेंबरला अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाईल आणि २३ डिसेंबरला पुन्हा शासकीय विधेयके सादर केली जातील. (प्रतिनिधी)