नागपुरातील कन्व्हेंशन सेन्टर हलविणार नाही
By Admin | Updated: February 11, 2015 02:37 IST2015-02-11T02:37:41+5:302015-02-11T02:37:41+5:30
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलजवळील ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे ...

नागपुरातील कन्व्हेंशन सेन्टर हलविणार नाही
नागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलजवळील ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर साकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर शहरातील कन्व्हेंशन सेंटर हलविण्याचा प्रश्नच नसल्याची माहिती माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूरला मेट्रोचा दर्जा मिळाल्याने नागपूर शहरापासून २५ किलोमीटर पर्यंत मेट्रोसिटीचा विकास होणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून ड्रॅगन पॅलेस टेम्पललगतच्या ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर नागपुरातील प्रस्तावित असलेल्या कन्व्हेंशन सेंटरच्या धर्तीवर बुद्धिस्ट थीम पार्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेन्टर साकार व्हावे यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली रविभवन येथे बैठक घेण्यात आली. यात त्यांनी या प्रकल्पाचा २१४ .५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना केल्याची माहिती कुंभारे यांनी दिली.
नागपूरच्या कन्व्हेंशन सेंटरसोबत कामठीतील सेंटरचा कोणताही संबंध नाही. उत्तर नागपुरात असे सेंटर उभे राहात असेल तर आनंदच आहे. दोन्ही सेंटरचा आराखडा वेगवेगळा आहे. (प्रतिनिधी)