ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:06+5:302021-06-27T04:07:06+5:30

नागपूर : ओबीसींचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले. मात्र आघाडी सरकार याचे खापर केवळ भाजप आणि केंद्र सरकारवर ...

Controversy over OBC's political reservation | ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर वादंग

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर वादंग

नागपूर : ओबीसींचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले. मात्र आघाडी सरकार याचे खापर केवळ भाजप आणि केंद्र सरकारवर फोडत आहे. आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजयी झालेल्या ओबीसी उमेदवारांचे सदस्यपद रद्द झाले, असा आक्रमक पवित्रा घेत शनिवारी भाजपच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. इकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी भाजपा व मोदी सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविणाऱ्यांना ओबीसींचा अचानक कसा पुळका आला, असे प्रतिउत्तर देत कॉँग्रेसही मैदानात उतरली.

आमडी फाटा येथे चक्का जाम

रामटेक : रामटेक विधानसभा क्षेत्रात आमडी फाटा येथे भाजपाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे नागपूर-जबलपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. माजी आमदार डी.एम.रेड्डी, डॉ. राजेश ठाकरे, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, जि.प.सदस्य सतीश डोंगरे, तालुका अध्यक्ष नरेंद्र बंधाटे, पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, जिल्हा उपाध्याय संजय मुलमुले आदी सहभागी झाले होते.

कामठीत तहसील कार्यालयासमोर निदर्शने

कामठी : कामठी तालुक्यात माजी जि.प. सदस्य अनिल निधान यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयापुढे भाजपाच्या वतीने चक्का जाम करीत महाविकास आघाडी सरकारच्या निषेध करण्यात आला. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष किशोर बेले, भाजप शहराध्यक्ष संजय कनोजिया, माजी तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, कामठी तालुका भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष मंगला कारेमोरे, महादुला नगर पंचायतचे अध्यक्ष राजेश रंगारी, पंचायत समिती सभापती उमेश रडके, मोहन माकडे, मनीष कारेमोरे आदी उपस्थित होते.

हिंगण्यात मेघेसह भाजपा कार्यकर्त्यांना अटक

हिंगणा : ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी हिंगणा येथील पंचवटी पार्क येथे आ. समीर मेघे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान हिंगणा पोलिसांनी आमदार मेघे यांच्यासह २० आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून काही वेळाने त्यांची मुक्तता करण्यात आली. आंदोलना दरम्यान या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. आंदोलनात भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संध्या गोतमारे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबादास उके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आदर्श पटले, धनराज आष्टनकर,बबलु गौतम आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काटोल तालुका

काटोल : काटोल येथे बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करीत भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, नागपूर जिल्हा किसान विकास आघाडीचे अध्यक्ष संदीप सरोदे, काटोल शहर अध्यक्ष जितेंद्र तुपकर, कार्याध्यक्ष विजय महाजन, काटोल तालुका अध्यक्ष योगेश चाफले, जिल्हा मंत्री दिलीप ठाकरे, लक्ष्मीकांत काकडे आदी सहभागी झाले होते.

जि.प., प.सं.च्या निवडणूक रद्द करा

नरखेड : ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसह जुलै महिन्यात होऊ घातलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुक रद्द करा अशी मागणी करीत नरखेड तालुक्यात भाजपाच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सावरगाव बसस्थानक चौकात झालेल्या या आंदोलनात जि.प.चे माजी शिक्षण सभापती उकेश चौव्हाण, तालुका अध्यक्ष सुनील कोरडे, शहर अध्यक्ष संजय कामडे, मनोज कोरडे, मयुर दंढारे, रवि माळोदे, स्वप्नील नागपुरे, धनराज खोडे, मनिष दुर्गे आदी सहभागी झाले होते.

कळमेश्वर तालुका

कळमेश्वर तालुक्यात ब्राह्मणी फाटा येथे भाजपाच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ येथे वाहतुकीला फटका बसला. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.राजीव पोतदार, तालुका अध्यक्ष दिलीप धोटे, जिल्हा महामंत्री ईमेश्वर यावलकर, शहर अध्यक्ष धनराज देवके, मीना तायवाडे, नगराध्यक्ष स्मृती ईखार, महादेव ईखार आदी याप्रसंगी उपस्थित होते.

मौद्यात टायर जाळले

मौदा : मौदा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे टायर जाळून भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाजपा जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, सदानंद निमकर, अशोक हटवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे, भाजपा तालुकाध्यक्ष हरीश जैन, कार्याध्यक्ष मुकेश अग्रवाल, युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद भोयर, जि.प.सदस्या राधा अग्रवाल, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष डॉ. नीलिमा घाटोळे, मौदा नगर पंचायत नगराध्यक्षा भारती सोमनाथे, उपाध्यक्ष मुन्ना चलसानी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

कुही तालुका

कुही तालुक्यात वडोदा रोड येथे भाजपाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अरविंद गजभिये, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री बालू ठवकर, पंचायत समिती सभापती अश्विनी शिवणकर, उपसभापती वामन श्रीरामे, डॉ. शिवाजी सोनसरे, जि.प. सदस्य कविता साखरवाडे,नरेश चौधरी आदी सहभागी झाले होते.

Web Title: Controversy over OBC's political reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.