नियंत्रण कक्षाचे तीन तेरा
By Admin | Updated: June 17, 2014 00:58 IST2014-06-17T00:58:03+5:302014-06-17T00:58:03+5:30
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु या कक्षाचा कुठेही ठावठिकाणा नाही. सिव्हिल लाईन येथील

नियंत्रण कक्षाचे तीन तेरा
आपत्ती निवारण : अग्निशमन विभागाचा दावा फोल
राजीव सिंह - नागपूर
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु या कक्षाचा कुठेही ठावठिकाणा नाही. सिव्हिल लाईन येथील अग्निशमन विभागाच्या अपत्ती निवारण कक्षापुढे एक टेबल व खूर्ची ठेवून यालाच नियंत्रण कक्षाचे स्वरूप देण्यात आले आहे. ऐवजदार हा कक्ष चालवित असून नियंत्रण कक्षाचा कुठेही ठावठिकाणा नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मदतीचा कॉल आल्यास डयुटीवरील ऐवजदार याची सूचना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देतो. त्यानुसार अग्निशमन विभाग आपत्ती निवारणाची कार्यवाही करतो. विशेष म्हणजे अग्निशमन विभागाच्या कार्यालयापुढे फायर टेंडर, बुलेट उभी ठेवली जाते. येथे पंप, बोट व लाईफ जॅकेटही ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अग्निशमन विभागाच्या कक्षात पाणी शिरले होते. परंतु अद्याप यावर उपाययोजना केली नसल्याचे चित्र आहे. अग्निशमन विभागाकडे गोडावून नसल्याने उपकरणे व वाहने उघड्यावर ठेवावी लागतात. व्यवस्था व्हावी यासाठी झोन स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे निर्देश आयुक्त श्याम वर्धने यांनी गेल्या वर्षी दिले होते. १ जूनपासून असे कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
असलेला कक्ष हिरावला
-गत काळात नियंत्रण कक्षासाठी मनपा मुख्यालयाच्या गेटच्या बाजूला असलेला कक्ष देण्यात आला होता. येथे अग्निशमन विभागाचे कर्मचारी बसत होते. परंतु नंतर राजकीय हस्तक्षेपातून हा कक्ष हिरावून ठेकेदारांना देण्यात आला. याचा गैरवापर केला जात होता. तत्कालीन महापौर विकास ठाकरे यांनी धाड घातली असता कर्मचारी पत्ते खेळताना आढळले होते. त्यामुळे त्यांनी हा कक्ष अग्निशमन विभागाला२ दिला होता.
तात्पुरती व्यवस्था
-स्वतंत्र जागा नसल्याने नियंत्रण कक्षाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निशमन कक्षाच्या बाजूची जागा हॉटमिक्सला दिली आहे. त्यामुळे विभागाकडे दुसरी जागा नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षातूनच आपत्ती निवारण कक्षाचे काम सुरू असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.