लोकमत न्यूज नेटवर्क,नागपूर : शासकीय देयके असल्याने थकीत कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर वर्मा ऊर्फ मुन्ना वर्मा यांच्या कंत्राटदारांसोबतच आत्महत्येमुळे शासकीय वर्तुळातदेखील खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा यांना शहरातील काही मोठ्या व्हाइट कॉलर मात्र अवैध सावकारी करणाऱ्यांकडून त्रास देण्यात येत होता.
वर्मा यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यासाठी प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्याची मागणी होत आहे.६१ वर्षीय वर्मा यांनी सोमवारी सकाळी राजनगर येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विविध कामांचे सुमारे ४० कोटी रुपयांचे बिल थकल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शासकीय देयके वेळेवर न मिळाल्याने वर्मा यांनी काहीजणांकडून मोठे कर्ज घेतले होते. व्याजापोटीच लाखो रुपये दरमहा जात होते. देयकांची थकबाकी न आल्याने व्याजाचा डोंगर वाढत चालला होता व अवैध सावकारांकडून त्यांना त्रास देणे सुरू झाले होते. वर्मा यांच्याकडे रामटेक आणि इतर काही ठिकाणी जमीन होती. ज्यांनी वर्मा यांना कर्ज दिले होते त्यांचे डोळे या जमिनींवरही होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आर्थिक कोंडी झाल्यामुळे वर्मा यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. वर्मा यांना कर्ज देणारे अवैध सावकार हे काही राजकारण्यांशी संबंधित आहेत. दरम्यान, पोलिसांना आत्महत्येच्या दिवशी वर्मा यांचा मोबाईल सापडला नव्हता. त्यामुळे तो चोरी गेला की काय अशी शंका आली होती. मात्र, खूप शोध घेतल्यानंतर तो स्वयंपाकघरातील बेसिनजवळ सापडला. मोबाईलची पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे.