Continue to be resentful, even if you receive contempt | तिरस्कार मिळाला तरी जिव्हाळा कायम ठेवा

तिरस्कार मिळाला तरी जिव्हाळा कायम ठेवा

ठळक मुद्देसरसंघचालकांचा भाजपला वडिलकीचा उपदेश : ‘जिव्हाळा’ पुरस्कारांचे वितरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : संघासाठी जिव्हाळा व विचारधारा या एकच गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीशी किंवा विचारांशी आत्मियतेचा भाव जोडण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. आत्मियतेमुळे लोक व भावना एकत्र येतात. एखाद्या वेळी तिरस्कार मिळाला तरी जिव्हाळा कायम ठेवा. कुणामधील त्रुटी दिसल्या तरी सर्वांशी आपलेपणाने वागा, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेत्यांना वडिलकीचा उपदेशच दिला. गुरुवारी ‘दान पारमिता’तर्फे जिव्हाळा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सायंटिफिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ‘दान पारमिता’चे संरक्षक डॉ.विलास डांगरे, कार्याध्यक्ष अविनाश संगवई, आशुतोष फडणवीस हे प्रामुख्याने उपस्थित होते. मुळात आत्मियता जगाचे मूळच आहे. जिव्हाळा कुणीही जन्मत: घेऊन येत नसतो, तर संस्कारातून तो घडत जातो. परोपकारातूनदेखील जिव्हाळा मिळतो. निवडणुकांमध्ये परोपकार करण्याची प्रवृत्ती बळावते. अनेकांचा त्यात स्वार्थ असतो. स्वार्थ सरला की परोपकारदेखील करत नाहीत. देशात जातीपातीचा भेद नको असे बहुतांश जणांना वाटते. त्यांना प्रत्यक्षात तसे वागणे भाग पाडण्यासाठी जिव्हाळाच महत्त्वाचा ठरतो. विलास फडणवीस यांना पाहिले की संघच दिसायचा. संघाचा कोणता स्वयंसेवक उत्तम अशी चर्चा काही जण करतात. जो माणसे जोडू शकतो, माणसांसोबत माणुसकीने वागतो तोच उत्तम स्वयंसेवक असे प्रतिपादन डॉ.मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जातीभेदाला स्थान नाही. सर्व जण एकाच परिवाराचे घटक आहेत. विलास फडणवीसांसारख्या व्यक्तींनी जिव्हाळ्याच्या माध्यमातून संघाचा विस्तार केला. कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, अंत:करणात प्रेरणा व पायाला भिंगरी लावलेली असली पाहिजे. कार्यकर्ता म्हणून संघ व अभाविपमध्ये काम करताना बरेच काही शिकलो व या संघटनांमुळेच मी घडलो. विचारधारेपेक्षा जिव्हाळा जास्त महत्त्वाचा असतो, असे नितीन गडकरी म्हणाले. यावेळी वेद विद्या वर्धिनी गुरुकुलम्ला ‘जिव्हाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विवेक पांढरीकर गुरुजी यांनी पुरस्कार स्वीकारला. अविनाश संगवई यांनी प्रास्ताविक केले, तर सृष्टी राऊत व सुशीलानी चकमा या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.

बरेचदा राजकारणातील जिव्हाळा ‘कृत्रिम’
राजकारणात अनेकजण ‘चमकेश’ असतात. तेथील जिव्हाळा अनेकदा कृत्रिम असतो. कार्यकर्त्यांसोबत कौटुंबिक जिव्हाळा हवा. कार्यकर्त्याला गुणदोषासह स्वीकारले पाहिजे. त्याचे दोष कमी करण्याची जबाबदारी संघटनेची असते, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Web Title: Continue to be resentful, even if you receive contempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.