हनीसिंग व बादशाहविरुद्ध अवमानना याचिका
By Admin | Updated: July 4, 2015 03:00 IST2015-07-04T03:00:21+5:302015-07-04T03:00:21+5:30
तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी. पी. सिंग उर्फ बादशाह यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात..

हनीसिंग व बादशाहविरुद्ध अवमानना याचिका
हायकोर्ट : शासनाला उत्तरासाठी चार आठवडे वेळ
नागपूर : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी. पी. सिंग उर्फ बादशाह यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी शुक्रवारी याचिकेतील तक्रारींवर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश राज्य शासनास दिलेत.
आनंदपालसिंग जब्बल असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते व्यावसायिक आहेत. जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाहविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाच्या एका आदेशाविरुद्ध दोन्ही गायकांनी उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करून पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश रद्द केला होता. यानंतर दोघांनीही दुसऱ्यांदा पाचपावली पोलीस ठाण्यात हजेरी लावली पण, पोलिसांना आवाजाचे नमुने दिले नाही. ही कृती पोलिसांना असहकार्य करणारी असल्यामुळे उच्च न्यायालयाची अवमानना झाली असे जब्बल यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)