ग्राहक मंच : आयुष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन पदाधिकाऱ्यांना कारावास व दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:06 IST2019-10-02T20:04:50+5:302019-10-02T20:06:02+5:30
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आदेशांच्या अवमान प्रकरणात आयुष कन्स्ट्रक्शन कंपनीचे पदाधिकारी सुनील उमरेडकर व संजय उमरेडकर यांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

ग्राहक मंच : आयुष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन पदाधिकाऱ्यांना कारावास व दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आदेशांच्या अवमान प्रकरणात आयुष कन्स्ट्रक्शन कंपनीचे पदाधिकारी सुनील उमरेडकर व संजय उमरेडकर यांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २७ अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच, तक्रारकर्त्या ग्राहकास १० हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कमही या पदाधिकाऱ्यांनीच द्यायची आहे.
मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. दत्तात्रय खिरटकर असे ग्राहकाचे नाव असून ते न्यू कैलाशनगर येथील रहिवासी आहेत. मंचने १५ एप्रिल २०१५ रोजी खिरटकर यांची तक्रार अंशत: मंजूर करून कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना विविध आदेश दिले होते. खिरटकर यांनी खरेदी केलेल्या सदनिकेचे बांधकाम करारानुसार सर्व सुविधांसह पूर्ण करण्यात यावे, त्यांच्याकडून उर्वरित ७६ हजार रुपये घेऊन त्यांना नोंदणीकृत विक्रीपत्र करून देण्यात यावे व सदनिकेचा ताबा देण्यात यावा, विक्रीपत्र करून ताबा देईपर्यंत खिरटकर यांना त्यांच्या १२ लाख २५ हजार रुपयावर १९ जुलै २०११ पासून ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे आणि त्यांना २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी या आदेशांचा त्यात समावेश होता. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या आदेशांचे पालन केले नाही. परिणामी, खिरटकर यांनी मंचमध्ये अर्ज दाखल केला होता. त्यावर मंचची नोटीस तामील झाल्यानंतर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची बाजू मांडून खिरटकर यांनी लावलेले आरोप फेटाळले होते. शेवटी मंचने विविध बाबी लक्षात घेता त्यांना दणका दिला.