ग्राहक मंच : भूखंडाचे विक्रीपत्र करा किंवा १८ टक्के व्याजासह रक्कम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:03 IST2019-01-09T23:01:46+5:302019-01-09T23:03:49+5:30
एका महिला ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे शुभलक्ष्मी लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका सहन करावा लागला. महिला ग्राहकास तिने खरेदी केलेल्या भूखंडाचा विक्रीपत्र नोंदवून ताबा देण्यात यावा किंवा तिच्याकडून घेतलेले ६९ हजार ५०० रुपये १८ टक्के व्याजासह तिला परत करावे असे आदेश मंचने बिल्डरला दिले. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम बिल्डरने द्यायची आहे.

ग्राहक मंच : भूखंडाचे विक्रीपत्र करा किंवा १८ टक्के व्याजासह रक्कम द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका महिला ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे शुभलक्ष्मी लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका सहन करावा लागला. महिला ग्राहकास तिने खरेदी केलेल्या भूखंडाचा विक्रीपत्र नोंदवून ताबा देण्यात यावा किंवा तिच्याकडून घेतलेले ६९ हजार ५०० रुपये १८ टक्के व्याजासह तिला परत करावे असे आदेश मंचने बिल्डरला दिले. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम बिल्डरने द्यायची आहे.
मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी ग्राहकाची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला. उमाबाई भलावी असे महिला ग्राहकाचे नाव असून त्या नागपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी शुभलक्ष्मी लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्सच्या मौजा नारी येथील ले-आऊट (खसरा क्र. १२५/२/१, पटवारी हलका क्र. ११)मधील ९०० चौरस फुटाचा अकृषक भूखंड १ लाख ४४ हजार रुपयांत खरेदी केला आहे. त्यांनी बिल्डरला आतापर्यंत ६९ हजार ५०० रुपये दिले आहेत. मंचने भलावी यांना त्यांच्याकडून उर्वरित ७४ हजार ५०० रुपये घेऊन भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याचा व भूखंडाचा ताबा देण्याचा आदेश बिल्डरला दिला आहे. विकासशुल्क व विक्रीपत्र नोंदणीसाठी येणारा खर्च भलावी यांनी सहन करावा असे सांगण्यात आले आहे. हे शक्य नसल्यास बिल्डरला भलावी यांना ६९ हजार ५०० रुपये १८ टक्के व्याजाने परत द्यायचे असून व्याज २२ डिसेंबर २०११ ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या निर्णयावर अंबलबजावणी करण्यासाठी बिल्डरला ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
भलावी व बिल्डरमध्ये २० जुलै २००९ रोजी भूखंड विक्रीचा करारनामा झाला आहे. बिल्डर भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देत नव्हता. त्यामुळे भलावी यांनी त्याला २९ एप्रिल २०१४ रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती. परंतु, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत मंचमध्ये तक्रार दाखल केली होती.
मंचचे निर्णयातील निरीक्षण
बिल्डरने करार करताना ले-आऊट विकसित करून देण्याचे वचन दिले आहे. परंतु, त्याने कराराची पूर्तता केली नाही. तसेच, तक्रारकर्तीला तिने भूखंडापोटी जमा केलेली आंशिक रक्कम विहित मुदतीत परत करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. तिला भूखंडासाठी आजपर्यंत ताटकळत ठेवले. ही बिल्डरने तक्रारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे. अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे. करारानुसार, भलावी या भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून मिळण्यास व बिल्डरच्या दोषपूर्ण सेवेमुळे आवश्यक भरपाई मिळण्यास पात्र आहे असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले आहे.