मॉडर्न सिटी बिल्टकॉनला ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 07:42 PM2019-06-14T19:42:18+5:302019-06-14T19:43:41+5:30

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मॉडर्न सिटी बिल्टकॉन कंपनीला दणका बसला. हे प्रकरण मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी निकाली काढले. तक्रारकर्त्या ग्राहकाला त्याचे ७ लाख ५६ हजार १०४ रुपये व त्यावर १५ टक्के व्याज किंवा विवादित भूखंडाची वर्तमान बाजार भावानुसार किंमत यापैकी जी रक्कम जास्त राहील ती अदा करण्यात यावी असे आदेश मंचने कंपनीला दिले आहेत.

Consumer Forum hammered to Modern City Builtcon | मॉडर्न सिटी बिल्टकॉनला ग्राहक मंचचा दणका

मॉडर्न सिटी बिल्टकॉनला ग्राहक मंचचा दणका

Next
ठळक मुद्देग्राहक हिताचे आदेश जारी : ग्राहकाला ५५ हजार रुपये भरपाई मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मॉडर्न सिटी बिल्टकॉन कंपनीला दणका बसला. हे प्रकरण मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी निकाली काढले. तक्रारकर्त्या ग्राहकाला त्याचे ७ लाख ५६ हजार १०४ रुपये व त्यावर १५ टक्के व्याज किंवा विवादित भूखंडाची वर्तमान बाजार भावानुसार किंमत यापैकी जी रक्कम जास्त राहील ती अदा करण्यात यावी असे आदेश मंचने कंपनीला दिले आहेत. ७ लाख ५६ हजार १०४ रुपयावर ६ जून २०१३ ते ही रक्कम प्रत्यक्ष अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. याशिवाय ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण ५५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक दिवशी १०० रुपये दंड अदा करावा लागेल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
अजय भाजने असे ग्राहकाचे नाव असून ते पुणे येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, भाजने यांनी मॉडर्न सिटी बिल्टकॉनच्या जाहिरातीला बळी पडून मौजा शिरुर, ता. हिंगणा येथील ले-आऊटमधील एक भूखंड ५ लाख ७८ हजार ९०० रुपयात खरेदी केला. त्यासंदर्भात १२ फेब्रुवारी २०१३ रोजी करार झाला. त्यानंतर भाजने यांनी मौजा उबाळी, ता. कळमेश्वर येथील ले-आऊटमधील एक भूखंड ३ लाख २० हजार ८०० रुपयात खरेदी केला. त्याचा ३१ मार्च २०१४ रोजी करार करण्यात आला. दरम्यान, भाजने यांनी कंपनीला एकूण ७ लाख ५६ हजार १०४ रुपये अदा केले. परंतु, कंपनीने करारात ठरल्याप्रमाणे भाजने यांना दोन्ही भूखंडांचे विक्रीपत्र करून दिले नाही. कायदेशीर नोटीसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भाजने यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. प्राथमिक सुनावणीनंतर मंचने कंपनीला नोटीस बजावली, पण कंपनी मंचसमक्ष हजर झाली नाही. त्यामुळे प्रकरणावर एकतफर् ी कार्यवाही करण्यात आली. मंचने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.
मंचचे निर्णयातील निरीक्षण
तक्रारकर्ता विक्रीपत्राच्यावेळी उर्वरित रक्कम देण्यास तयार आहे. परंतु, कंपनी विक्रीपत्र नोंदवून देण्यास टाळाटाळ करीत असल्याने ती रक्कम अदा करावयाची राहून गेली आहे. कंपनीने तक्रारकर्त्याची रक्कम स्वत:च्या फायद्याकरिता वापरली आहे. हा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे. त्यामुळे, तक्रारकर्त्याला शारीरिक-मानसिक त्रास व आर्थिक खर्च सहन करावा लागला. त्यांच्या वेळेचा अपव्यव झाला असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले आहे.

Web Title: Consumer Forum hammered to Modern City Builtcon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.