डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST2021-02-20T04:19:54+5:302021-02-20T04:19:54+5:30
नागपूर : ‘कोरोना’ काळातील ‘लॉकडाऊन’नंतरदेखील कामठी मार्गावरील डबलडेकर उड्डाणपुलाच्या कामाची गती मंदावलेलीच आहे. ट्रान्स्पोर्ट प्लाझाजवळ व गुरुद्वाराजवळ अद्यापही केवळ ...

डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती मंदावली
नागपूर : ‘कोरोना’ काळातील ‘लॉकडाऊन’नंतरदेखील कामठी मार्गावरील डबलडेकर उड्डाणपुलाच्या कामाची गती मंदावलेलीच आहे. ट्रान्स्पोर्ट प्लाझाजवळ व गुरुद्वाराजवळ अद्यापही केवळ पिलर्सच उभे झालेले आहेत. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले नसताना दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे. हीच संथ गती कायम राहिली तर नागरिकांना आणखी बराच काळ असुविधेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
हे काम नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरू झाले व २८ महिन्यांत ते पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आता ३९ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, काम अद्यापही संथगतीनेच सुरू आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये टेकानाका, मातामंदिर चौकाजवळ २७ मीटर ‘काँक्रीट सेगमेन्ट’चा एक भाग तुटला होता. यातून काम योग्य पद्धतीने व कमकुवत पद्धतीने झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या पूर्ण ‘काँक्रीट ब्लॉक’ला बदलविण्यातच एक महिन्याचा कालावधी लागला होता. गड्डीगोदामपासून एलआयसी चौकापर्यंतच्या मार्गावरदेखील कामात फारशी प्रगती झालेली नाही. अनेकदा अधिकारी बांधकामस्थळावर उपस्थितच नसल्याचे दिसून आले आहे.
यासोबतच इंदोरा चौकाला डबलडेकर पुलाने जोडण्याच्या दिशेनेदेखील प्रभावी काम झालेले नाही. डबलडेकर पुलामध्ये वाहनांसाठी बनणाऱ्या पुलाचा पृष्ठभाग दर्जेदार असावा याकडेदेखील कंत्राट घेणाऱ्या कंपनीला लक्ष द्यावे लागेल. मानकापूर चौकावरील उड्डाणपुलाचा भाग कमकुवत असल्याचे आढळले होते. त्याला तोडून परत बनविण्यात आले होते.