कृष्णा किरवलेंची हत्या षड्यंत्रच

By Admin | Updated: March 5, 2017 02:04 IST2017-03-05T02:04:55+5:302017-03-05T02:04:55+5:30

आंबेडकरी चळवळ आणि साहित्यातील ‘थिंक टँक’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख

Conspiracy to murder Krishna Kirvalen | कृष्णा किरवलेंची हत्या षड्यंत्रच

कृष्णा किरवलेंची हत्या षड्यंत्रच

मान्यवरांचे प्रतिपादन : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची निषेध सभा
नागपूर : आंबेडकरी चळवळ आणि साहित्यातील ‘थिंक टँक’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या होणे धक्कादायक आहे. आंबेडकरी विचारवंतांना संपवून चळवळ खिळखिळी करण्याचे षङ्यंत्र यामागे असून अशा प्रवृत्तीला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.
आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ नागपुरातील आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी आज संविधान चौकात निषेध सभेचे आयोजन करून आपला संताप व्यक्त केला. कृष्णा किरवलेंची हत्या ही दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी या मालिकेतील असून त्यादिशेने पोलिसांनी तपास करण्याची मागणी सर्वांनी एकमुखाने रेटून धरली. निषेध सभेत बोलताना बहुजन विचारवंत जेमिनी कडू म्हणाले, कृष्णा किरवलेंच्या हत्येमागे घरगुती कारण असेल असे अखेरपर्यंत पटणे अशक्य आहे. असहिष्णुतेच्या वातावरणात त्यांच्यासारख्या विचारवंताची हत्या होणे हा मोठा धक्का आहे. ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम म्हणाले, अमानवी प्रवृत्ती आंबेडकरी विचारधारेच्या मागे लागली आहे. त्यांना उत्तर देणारी यंत्रणा आपल्याकडे असणे गरजेचे आहे. आंबेडकरी समाजातील विखुरलेपणा दूर करणे आवश्यक आहे.
त्यासाठी आणखी एखाद्या विचारवंताच्या हत्येची वाट न पाहता आंबेडकरी चळवळीच्या एकीकरणाची बाब मनावर घेणे गरजेचे आहे. डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येची शाई वाळते न वाळते तोच किरवले यांची हत्या होणे चळवळीसाठी धक्कादायक बाब असल्याचे मत व्यक्त केले.
समता सैनिक दलाचे प्रवक्ते अशोक बोंदाडे म्हणाले, वैचारिक शक्ती प्रभावशाली असते. त्यांच्यामुळेच क्रांती घडते. त्यामुळे या हत्येमागे जे कारण सांगण्यात येत आहे, त्यावर विश्वास ठेवता येत नाही. रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहणे यांनी विचारवंत आंबेडकरी चळवळीला गतिमान करीत असतात. त्यामुळे अशा भ्याड हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी किरवलेंची हत्या बाबासाहेबांचे विचार दाबण्याचे षङ्यंत्र असून, याविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन त्याचा विरोध करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले. डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी किरवलेंनी आंबेडकरी चळवळ गतिमान केल्याचे सांगून त्यांची हत्या ही मानवतेला काळिमा फासणारी बाब असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय म्हणाले, किरवलेंचे विचार इतरांना बोचणारे होते. अशा घटना होऊ नये यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते भूपेश थुलकर म्हणाले, कोल्हापूर परिसरात अशा घटना सातत्याने घडत असल्याचे सांगून हे एक षडयंत्र आहे, या दिशेने तपास होण्याची गरज आहे. संचालन राजन वाघमारे यांनी केले. सभेला प्रा. रत्नाकर मेश्राम, मिलिंद फुलझेले, विनोद थुल, सतीश तांबे, लक्ष्मीकांत मेश्राम, नत्थु नाईक, राहुल दहिकर, अ‍ॅड. स्मिता कांबळे, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, डॉ.सविता कांबळे, थॉमस कांबळे, पी. टी. खोब्रागडे, हृदय चक्रधर, विनोद उलीपवार, प्रा. चंद्रशेखर पाटील, दीक्षित आवळे, मनोहर नगराळे, डॉ. नीलिमा चव्हाण, डॉ. सुदेश भोवते, डॉ. नीरज बोधी, महेंद्र गायकवाड, अ‍ॅड. सुरेश घाटे, प्रमोद मून, सीताराम राठोड, विलास पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Conspiracy to murder Krishna Kirvalen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.