चातुर्मासात होणार साधू समाजाचे एकत्रीकरण

By Admin | Updated: July 15, 2015 03:23 IST2015-07-15T03:23:29+5:302015-07-15T03:23:29+5:30

‘अंतर्मना’ नावाने प्रसिद्ध असलेले आचार्य पुष्पदंतसागरजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री प्रसन्नसागर महाराज आणि पीयूषसागर महाराज

Consolidation of Sadhu Samaj will be done in Chaturmas | चातुर्मासात होणार साधू समाजाचे एकत्रीकरण

चातुर्मासात होणार साधू समाजाचे एकत्रीकरण

‘अंतर्मना’ मुनीश्री प्रसन्नसागर महाराज आणि पीयूषसागर महाराज : १७ जुलै रोजी होणार नगरप्रवेश
नागपूर : ‘अंतर्मना’ नावाने प्रसिद्ध असलेले आचार्य पुष्पदंतसागरजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री प्रसन्नसागर महाराज आणि पीयूषसागर महाराज अहिंसा संस्कार पदायात्रेच्या माध्यमातून संस्कारांचा शंखनाद करीत नागपूर नगरीत प्रवेश करीत आहेत. जवळपास ७५ हजार किलोमीटरची पदयात्रा केलेल्या या दिगंबर संतांच्या चातुर्मासासाठी भव्य आयोजन करण्यात आले असून, आचार्य गुरुदेवांचा नगरात ऐतिहासिक प्रवेश १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे. महाराजांच्या आगमनानंतर पावन वर्षा योग समितीच्यावतीने चातुर्मासादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात माहिती देताना मुनीश्रींनी पत्रकारांशी संवाद साधला. धर्म आणि सत्संगाच्या प्रचारात प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. जुन्या काळात नागरिकांना सत्संगाचा लाभ दुर्लभ होता. पण प्रसार माध्यमांमुळे लोकांपर्यंत सत्संग सहजपणे पोहोचतो आहे. केवळ सत्संग पाहून आणि ऐकून कुणातच बदल होत नाही. कुणीच स्वत:मध्ये परिवर्तन करू इच्छित नाही. सत्संगाचा लाभ घेत आपले आचरण सुधारणे आणि स्वत:त बदल घडवून आणणे आवश्यक आहे. मुनीश्री म्हणाले, संसाराच्या हितासाठी संत, नदी आणि सूर्य कधीच एका स्थानावर थांबत नाहीत. ते सातत्याने चालत राहतात. संत वर्षातील बारा महिन्यांपैकी आठ महिने भ्रमण करीत असतात. केवळ पावसाळ्यात ते चार महिने एका स्थानी थांबून साधना करतात. साधू चातुर्मासादरम्यान स्वत:ला स्वत:शी आणि समाजाशी जोडण्याचे कार्य करतात. त्यामुळेच चातुर्मास अतिशय महत्त्वाचा आहे. पूर्वी लोक २३ तास काम करीत होते आणि त्याचे फळ एक तास भोगत होते. पण आज माणूस एक तास काम करून २३ तास त्याचे फळ भोगण्याची इच्छा ठेवतो. गरिबांपासून श्रीमंत माणसापर्यंत सारेच सुखी होण्यासाठी धडपडत आहेत. पालक मुलांना शिक्षण देण्यासाठी चिंतित आहेच, पण संस्कार देण्यासाठी त्यांना चिंता वाटत नाही. त्यामुळेच जीवनात संस्काराअभावी सर्व समस्या निर्माण होत आहेत, असे मुनीश्री म्हणाले.
चातुर्मास समितीचे पदाधिकारी
मुनीश्रींचा चातुर्मास यशस्वी करण्यासाठी आणि धर्मप्रेमींना मुनीश्रींच्या सत्संगाचा लाभ मिळवून देण्यासाठी अंतर्मना मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज चातुर्मास समितीची स्थापना करण्यात आली आहे. याचे संरक्षक सकल जैन समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार विजय दर्डा, खा. अजय संचेती, नरेद्र बरडिया आहेत. अध्यक्ष नरेश पाटणी, कार्याध्यक्ष राकेश पाटणी, संयोजक प्रकाश बोहरा, महामंत्री पंकज बोहरा, स्वागताध्यक्ष रतनलाल गंगवाल, संतोष पेंढारी, अरुण पाटोदी, योगेश बोहरा, निरंजन बोहरा, सहसंयोजक हुकूमचंद सेठी, उपाध्यक्षगण शांतिलाल बज, महावीर रावंका, सुरेंद्र ठोल्या, किशोर बाकलीवाल, विजय गोधा, मंत्रिगण सुबोध कासलीवाल, कमल बज, नरेश कासलीवाल आणि कोषाध्यक्ष प्रशांत पाटणी, संजय सेठी, सुनील पाटणी, अधीर पाटणी यांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)
चातुर्मासात होणारे विविध कार्यक्रम
१७ जुलै - भव्य मंगल प्रवेश
३० जुलै - चातुर्मास वर्षायोग कलश स्थापना
३१ जुलै - गुरुपौर्णिमा
१ आॅगस्ट - वीर शासन जयंती
१५ आॅगस्ट - राष्ट्रीय पर्वानिमित्त विशेष प्रवचन
२२ आॅगस्ट - भगवान पार्श्वनाथ निर्वाण महोत्सव
२९ आॅगस्ट - रक्षाबंधन कथा प्रवचन
३० आॅगस्ट - अमृत संस्कार महोत्सव
१८ सप्टेंबर - दशलक्षण महापर्व
२९ सप्टेंबर - क्षमावाणी महापर्व
२ ते ७ आॅक्टोबर - सम्मेद शिखरजी यात्रा
१३ आॅक्टोबर - नऊ दिवसीय ऋद्धी, सिद्धी, समृद्धी
२३ आॅक्टोबर - जिनेंद्र महार्चना
२७ आॅक्टोबर - शरद पौर्णिमा
९ नोव्हेंबर - धनत्रयोदशी
१० नोव्हेंबर - चतुर्दशी चातुर्मास निष्ठापन
११ नोव्हेंबर - महावीर निर्वाण महोत्सव
१५ नोव्हेंबर - जिन सहस्रनाम अनुष्ठान
१६ नोव्हेंबर - पिच्छिका परिवर्तन, मंगल कलश
निष्ठापन आणि निरोप समारंभ

Web Title: Consolidation of Sadhu Samaj will be done in Chaturmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.