३८ शेतकऱ्यांनी सादर केले संमतीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2016 02:26 IST2016-10-09T02:26:35+5:302016-10-09T02:26:35+5:30

राज्याच्या संतुलित व समतोल विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी ...

The consent sheet submitted by 38 farmers | ३८ शेतकऱ्यांनी सादर केले संमतीपत्र

३८ शेतकऱ्यांनी सादर केले संमतीपत्र

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग : १०६.२६ हेक्टर शेतजमीन उपलब्ध
नागपूर : राज्याच्या संतुलित व समतोल विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आहे. नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्गासाठी ३८ शेतकऱ्यांनी १०६.२६ हेक्टर शेतजमिनी उपलब्ध करून देण्यासंबंधीचे संमतीपत्र जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना भेटून हिंगणा तालुक्यातील भानसोली येथील नीतेश कैलाशचंद्र बगडिया (सर्व्हे नं.५५/३), जिजाबाई शेषराव हिवरकर (५५/१), अ‍ॅड. दिनेश नामदेव तायडे (५५/४), धनराज पांडुरंग हिवरकर व ललिता हिवरकर (५५/२), पुष्पाताई दशरथ कामडे मोहगाव (५५/३), तसेच रामा वनासाखे, बंडू दौलतराव ठाकरे, देवनार गोविंदा उईके, दिवानजी मारोती मडावी या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीसंदर्भातील पत्र सादर केले. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते.
समृध्दी महामार्ग प्रकल्पासाठी हळदगाव येथील ११ शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिले असून सावंगी व भानसोली येथील प्रत्येकी १२ तर वाडेगाव येथील एक अशा ३६ शेतकऱ्यांनी जिराईत जमीन असलेल्या १०३.५६ हेक्टरसाठी संमतीपत्र दिले आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या खरपी गांधी, बोरगाव येथील दोन शेतकऱ्यांनी २.७ हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणासाठी संमतीपत्र जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले आहे. नागपूर ते मुंबई या दोन महानगरादरम्यान अतिजलद वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून महामार्गाच्या विकास व बांधणीसाठी लॅण्ड पुलिंग मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे. भूधारकांसाठी देय मोबदला आणि त्या अनुषंगिक लाभासाठी मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांचा व भूधारकांच्या हिताचा हा निर्णय असल्यामुळे शेतकऱ्यांनीही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शेती उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र सादर केले आहे. नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा हिंगणा तालुक्यातील शिवमडका येथून सुरू होत असून हळदगाव, वडगाव येथून वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. २८.५ किलोमीटर लांबीच्या महामागार्साठी २० गावातील खासगी, शासकीय, वनजमीन अशा एकूण १३४९.५२ हेक्टर जमिनीवरून हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ८१९ खातेदारांचा समावेश असून भूसंचयन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र समृध्दी महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The consent sheet submitted by 38 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.