काँग्रेसचा एल्गार, रास्ता रोको!
By Admin | Updated: August 5, 2015 02:39 IST2015-08-05T02:39:25+5:302015-08-05T02:39:25+5:30
लोकसभेत गोंधळ घातल्याच्या मुद्यावरून लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या २५ खासदारांना २५ दिवसांसाठी निलंबित केले.

काँग्रेसचा एल्गार, रास्ता रोको!
झाशी राणी चौकात अडविल्या बसेस : मोदींच्या पोस्टरला काळे फासले, पुतळा जाळला
नागपूर : लोकसभेत गोंधळ घातल्याच्या मुद्यावरून लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या २५ खासदारांना २५ दिवसांसाठी निलंबित केले. याचा निषेध म्हणून सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांनी संसदेसमोर धरणे दिले. तर, प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून नागपुरात शहर काँग्रेसनेही झांशी राणी चौकात आंदोलन करीत एल्गार पुकारला. तब्बल तासभर रास्ता रोको करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोदी यांच्या पोस्टरला काळे फासून त्यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करून गुन्हे दाखल केले.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते झांशी राणी चौकात जमले व मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी चौकातून जात असलेल्या स्टार बस व एसटी महामंडळाच्या बस थांबविल्या व एकूण सहा बसच्या चाव्या काढून घेतल्या. बस रस्त्यातच उभ्या राहिल्यामुळे झाशी राणी चौकातून वाहनांना जाण्यास जागाच उरली नाही. परिणामी ट्रॅफिक जाम झाले. झांशी राणी चौक ते लोकमत चौक, महाराज बाग रोड, संविधान चौक व जानकी टॉकीजपर्यंत चारही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहचले. पण बसच्या चाब्या नव्हत्या. पोलिसांनी विनंती केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बसच्या चाब्या दिल्या व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले. मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा उड्डाण पुलाला लटकविला व नंतर जाळला. एवढेच नव्हे तर मोदी यांचा फोटो असलेल्या बॅनरची प्रेतयात्राही काढली. ‘लोकशाही के देशमे, तानाशाही जोश मे’, अशी नारेबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनानंतर सीताबर्डी पोलिसांनी विकास ठाकरे यांच्यासह नगरसेवक प्रशांत धवड, उमाकांत अग्निहोत्री, पंकज निघोट, विवेक निकोसे, पंकज थोरात आदींना अटक केली व गुन्हे दाखल केले. आंदोलनात कृष्णकुमार पांडे, शेख हुसेन, नगरसेवक दीपक कापसे, योगेश तिवारी, सुजाता कोंबाडे, पद्मा उईके, प्रेरणा कापसे, रेखा बाराहाते, सरस्वती सलामे, शीला मोहोड, निमिषा शिर्के, दीपक वानखेडे, इंद्रसेन ठाकूर, राजू व्यास, गजराज हटेवार, विजय बाभरे, संजय दुबे, रामगोविंद खोब्रागडे, परमेश्वर राऊत, नाना झोडे, आकाश तायवाडे, किरण यादव, स्वप्नील काटोवर आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
पोलिसांची तारांबळ
काँग्रेस एवढे तीव्र आंदोलन करेल याची पोलिसांना कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे नारेनिदर्शने होतील, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी नियोजनपूर्वक पोलिसांचा अंदाज चुकविला. रास्ता रोको करून तब्बल पाऊण तास वाहतूक खोळंबल्यानंतर पोलीस पोहोचले. बसच्या चाव्या मिळविण्यासाठी पोलिसांना अक्षरश: विनंती करावी लागली.