गृहविभागावर काँग्रेसजन नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:46+5:302021-01-16T04:11:46+5:30

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असताना केंद्र सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला बळ देण्याऐवजी गुन्हे ...

Congressmen angry over home department | गृहविभागावर काँग्रेसजन नाराज

गृहविभागावर काँग्रेसजन नाराज

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असताना केंद्र सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला बळ देण्याऐवजी गुन्हे दाखल केले जातात, यावर युवक काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन असले तर पोलीस बघ्याच्या भूमिकेत असतात व युवक काँग्रेसचे आंदोलन असले की आक्रमक भूमिका घेतात. गृहविभाग भेदभाव करीत असून काँग्रेस कार्यकर्त्यांना दाबण्याचे काम करीत आहे, अशी थेट तक्रार अ.भा. युवक काँग्रेसचे सचिव नगरसेवक बंटी शेळ‌के यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी बिल विरोधात युवक काँग्रेसतर्फे १२ जानेवारी रोजी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या स्मृतिमंदिरसमोर थाली बजाओ आंदोलन करण्यात आले होते. अचानकपणे केलेल्या या आंदोलनामुळे सुरक्षा एजन्सीची धावपळ उडाली. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत आंदोलनाचे नेतृत्व करणारे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह १९ आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

या अटकेमुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दुखावले आहेत. १६ जानेवारी रोजी राजभवनाला घेराव घालण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू आहे. यासाठी गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक होती. तीत बंटी शेळके युवक काँग्रेसची टीम घेऊन पोहचले व पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांबद्दल अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आशीष दुआ यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी प्रत्येक आंदोलनात युवक काँग्रेसचा सक्रिय सहभाग असतो. असे असतानाही जेव्हा पक्षासाठी एखादे आंदोलन केले जाते तेव्हा आपल्यावर गुन्हे दाखल होतात. भाजपची सत्ता असतानाही असे गुन्हे दाखल केले जात नव्हते. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असताना काँग्रेस नेते मध्यस्थी का करीत नाही, असा थेट सवाल शेळके यांनी दुआ यांच्याकडे केला. अशा कठिण प्रसंगी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून आवश्यक पाठबळ मिळत नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

...तर गृहमंत्र्यांशी चर्चा करू

काँग्रेस पक्ष युवा कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. शेळके यांच्यासह युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक होताच पालकमंत्र्यांनी पुढाकर घेऊन त्यांना सोडविले. यापुढे गरज भासली तर काँग्रेसचे मंत्री गृहमंत्र्यांशी चर्चा करतील.

- आशीष दुआ

सचिव, अ.भा. काँग्रेस समिती

Web Title: Congressmen angry over home department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.