सावनेर तालुक्यात काँग्रेसचा दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:46+5:302021-01-19T04:10:46+5:30
बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : तालुक्यातील अविराेध झालेल्या जटामखाेरा व अन्य ११ ग्रामपंचायतींवर काँग्रेस समर्थित गटाने दणदणीत ...

सावनेर तालुक्यात काँग्रेसचा दणदणीत विजय
बाबा टेकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : तालुक्यातील अविराेध झालेल्या जटामखाेरा व अन्य ११ ग्रामपंचायतींवर काँग्रेस समर्थित गटाने दणदणीत विजय संपादन केल्याने भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासह अन्य राजकीय पक्षांचा मतदारांनी हिरमाेड केला आहे. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमधील १४ उमेदवारांची अविराेध निवड करण्यात आल्याने ९६ जागांसाठी लढत झाली. यात काँग्रेस समर्थित गटाने ७५, तर भाजप समर्थित गटाने २० जागा जिंकल्या. इतरांच्या वाट्याला एकमेव जागा आली.
यावेळी तालुक्यातील खुबाळा, नांदोरी, खुर्सापार, टेंभूरडाेह, गडमी, जैतपूर, सोनपूर, नरसाळा, पोटा, पाटणसावंगी व सावंगी (हेटी) या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली, तर जटामखाेरा येथील निवडणूक अविराेध पार पडली. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे मूळ गाव असलेल्या पाटणसावंगी येथे काँग्रेस समर्थित गटाने १५, तर भाजप समर्थित गटाने दाेन जागा जिंकल्या. सावंगी (हेटी) येथे काँग्रेस समर्थित गटाने पाच, तर भाजप समर्थित गट व अपक्षांनी प्रत्येकी दाेन जागा जिंकल्या. नरसाळा येथे एकूण सातपैकी काँग्रेस समर्थित गटाने पाच, तर भाजप समर्थित गटाने दाेन जागा जिंकल्या. भागीमहारी येथे काँग्रेस समर्थित गटाचे उमेदवार तथा माजी सरपंच सुनील डाखाेळे यांना पराभव पत्करावा लागला. साेनपूर येथे एकूण सात जागांपैकी पाच जागा काँग्रेस समर्थित गटाने जिंकल्या असून, दाेन जागा अपक्षांनी बळकावल्या. येथे माजी सरपंच राजू आत्राम व भाजप समर्थित गटाचे बबन माहुरे यांना मतदारांनी नाकारले. जैतपूर येथे काँग्रेस समर्थित एका गटाने पाच, तर काँग्रेसच्याच दुसऱ्या गटाने दाेन जागा जिंकल्या. येथील तिहेरी लढतीत काँग्रेस समर्थित गटाचे प्रमुख अरविंद नाईक व त्यांच्या पत्नीला पराभवाला सामाेरे जावे लागले. गडमी येथे काँग्रेस समर्थित गटाने चार, तर भाजप समर्थित गटाला तीन जागा मिळाल्या. खुर्सापार येथे काँग्रेसच्याच दाेन गटात अटीतटीची लढत झाली. यात एका गटाला पाच, तर दुसऱ्या गटाला दाेन जागा मिळाल्या.
नांदाेरी येथे काँग्रेस समर्थित गटाने सातही जागा जिंकल्याने भाजप समर्थित गटाला खातेही उघडता आले नाही. येथे माजी सरपंच तथा भाजप समर्थित गटाच्या अर्चना काेंगरे यांचे पती उमाजी काेंगरे यांना मतदारांनी नाकारले. नंदापूर येथे उपसरपंच जगदीश धाेटे यांच्या पॅनलचा सुपडा साफ झाला. येथे सातही जागा काँग्रेस समर्थित गटाने बळकावल्या असून, भाजप समर्थित गटाला एकही जागा जिंकता आली नाही. खुबाळा येथे नऊपैकी सहा जागा काँग्रेस समर्थित गटाने जिंकल्या असून, तीन जागा भाजप समर्थित गटाच्या वाट्याला गेल्या आहेत. टेंभूरडाेह येथेही काँग्रेस समर्थित गटाने सर्वच अर्थात सातही जागा जिंकल्याने भाजप समर्थित गटाची गाेची झाली आहे.
....
कही खुशी, कही गम
पाटणसावंगी येथे काँग्रेस समर्थित गटाचे उमेदवार तथा माजी सरपंच अनिल पानपत्ते व भाजप समर्थित रवींद्र जाधव यांना पराभव पत्करावा लागला. येथे काँग्रेस समर्थित गटाचे दीपक दलाल यांनी भाजप समर्थित गटाचे रवींद्र हटकार यांना पराभूत केले. पाेटा येथे माजी सरपंच तथा काँग्रेस समर्थित गटाच्या उमेदवार वंदना ढगे तसेच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नरेश खापरे यांनाही पराभवाला सामाेरे जावे लागले. येथे माजी उपसरपंच अनिल छानीकर व माजी सरपंच रिंकू सिंग यांनी विजय संपादन केला. सावंगी (हेटी) येथे माजी उपसरपंच संजय गाेडबाेले यांना मतदारांनी नाकारले असून, माजी सरपंच अशाेक डवरे यांना मात्र साथ दिली.