जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी !
By Admin | Updated: August 3, 2015 02:39 IST2015-08-03T02:39:59+5:302015-08-03T02:39:59+5:30
जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतरही जिल्हाध्यक्षपदी सुनीता गावंडे कायम आहेत.

जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी !
नऊ वर्षे एकहाती धुरा का? : मोहिते, मुळक, केदार गटात अनेक इच्छुक
नागपूर : जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतरही जिल्हाध्यक्षपदी सुनीता गावंडे कायम आहेत. गावंडे यांच्याकडे तब्बल नऊ वर्षांपासून जिल्हा काँग्रेसची सूत्रे आहेत. दीर्घकालापासून काँग्रेसची धुरा एकहाती का, असा प्रश्न काँग्रेस वर्तुळात चर्चिला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार यांच्या गोटात जिल्हाध्यक्षपदासाठी बरेच इच्छुक आहेत. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक हे या मुद्यावर काहीच निर्णय घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वासनिकांचा मान म्हणून कुणीही उघडपणे बोलत नसले तरी आतून धुसफूस सुरू असून लवकरच असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीता गावंडे यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा तीन निवडणुका झाल्या. मात्र, तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेत असलेली सत्ता हातून गेली. लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना रामटेक मतदारसंघात मोठा पराभव पत्करावा लागला तर, विधानसभा निवडणुकीत सहाच्या सहाही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले. त्यावेळी नागपूर शहर काँग्रेसची धुरा जयप्रकाश गुप्ता यांच्याकडून विकास ठाकरे यांना देण्यात आली. मात्र, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांना कार्यकाळ पूर्ण होऊनही पदावर कायम ठेवण्यात आले. ही बाब पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना चांगलीच खटकली होती. मात्र, वासनिक यांनी हा निर्णय घेतला असल्यामुळे कुणी उघडपणे विरोध केला नाही.
दीड वर्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे. जिल्हा परिषद ही मिनी विधानसभेची निवडणूक मानली जाते. या निवडणुकीत ज्यांचा डाव साधला त्यांच्यासाठी पुढील निवडणुका आणखी सोप्या होतात. ग्रामीण राजकारणातील सत्तेची सूत्रे जिल्हा परिषदेतूनच हलविली जातात. मात्र, एवढी महत्त्वाची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण नाही.
प्रदेशाध्यक्षांना साकडे, वासनिकांनाही भेटणार
तब्बल तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सलग पराभव झाल्यानंतरही सुनीता गावंडे या जिल्हाध्यक्ष पदावर कायम आहेत. आता त्यांच्याजागी दुसऱ्या सक्षम व्यक्तीला संधी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन केल्याची माहिती आहे. संबंधित शिष्टमंडळ लवकरच माजी मंत्री मुकुल वासनिक यांचीही भेट घेणार आहे. विशेष म्हणजे वासनिक यांच्या विश्वासातील काही नेते मंडळींनीही या मोहिमेला छुपा पाठिंबा देत असल्यामुळे या मोहिमेकडे काँग्रेसमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.