विदर्भ राखण्यासाठी काँग्रेसची कवायत
By Admin | Updated: July 20, 2014 01:17 IST2014-07-20T01:17:00+5:302014-07-20T01:17:00+5:30
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभेत विदर्भ कायम राखण्यासाठी काँग्रेस आता ‘सिरियसली’ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन

विदर्भ राखण्यासाठी काँग्रेसची कवायत
२५ रोजी विभागीय मेळावा : मुख्यमंत्री चव्हाण, मोहन प्रकाश येणार
नागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभेत विदर्भ कायम राखण्यासाठी काँग्रेस आता ‘सिरियसली’ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी विभागीय मेळावे घेतले जात असून २५जुलै रोजी मानकापूर येथे नागपूर विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा गड होता. मात्र, भाजपने विदर्भात मजबूत संघटनात्मक बांधणी केली. काँग्रेसमधील असंतुष्टांना जवळ केले आणि काँग्रेसला चांगलाच हात दाखविला. भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांची कर्मभूमी विदर्भ आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आपली पूर्ण ताकद विदर्भ काबीज करण्यासाठी लावणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते वेळीच सावध झाल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी राज्यभर विभागीय मेळावे घेतले जात असून नागपुरातही विदर्भ विभागीय मेळावा होत आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अ.भा. काँग्रेस समितीचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह विभागातील प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कॅम्पेन कमी पडले. पदाधिकारी सक्रिय दिसले नाही. त्यामुळे या वेळी आजी- माजी खासदार, आमदार, प्रदेश व शहर पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय यांच्यासह पक्षाच्या विविध सेलच्या प्रमुखांना सक्रिय करून जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. याशिवाय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मंत्र्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)