काँग्रेस,राष्ट्रवादीचा वेगळ्या विदर्भाला ‘खो’
By Admin | Updated: October 5, 2014 00:56 IST2014-10-05T00:56:19+5:302014-10-05T00:56:19+5:30
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वेगळ्या विदर्भाचा मुद्दादेखील तापताना दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भर द्यावा, असे आवाहन विदर्भवादी संघटनांकडून करण्यात आले होते.

काँग्रेस,राष्ट्रवादीचा वेगळ्या विदर्भाला ‘खो’
नागपूर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वेगळ्या विदर्भाचा मुद्दादेखील तापताना दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भर द्यावा, असे आवाहन विदर्भवादी संघटनांकडून करण्यात आले होते. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचा कुठेच उल्लेख न झाल्यामुळे विदर्भवादी नाराज झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर भाजपाची भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
जर बहुसंख्य नागरिकांची भावना असेल तर वेगळा विदर्भ व्हायला हवा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महिन्यांअगोदर केले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भासंदर्भात कुठेही उल्लेख केलेला नाही. वेगळ्या विदर्भाचा निर्णय नेत्यांनी नव्हे जनतेने घ्यायचा आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ज्यांनी निवडणुका लढविल्या ते अयशस्वी झाले, असे मत जाहीरनामा घोषित झाल्यानंतर व्यक्त करून पवारांनी वेगळ्या विदर्भाला विरोध असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सुचित केले. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सुरुवातीलाच एकसंघ महाराष्ट्राचा निर्धार करण्यात आला आहे. जाहीरनाम्यात नागपूरच्या विकासासाठी ‘मोनोरेल’ आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिवाय राज्यातील इतर विभागांसोबतच विदर्भात उद्योग आणण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्यात येईल, असे आश्वासनदेखील देण्यात आले आहे.
दुसरीकडे काँग्रेस पक्षानेदेखील वेगळ्या विदर्भाला जाहीरनाम्यात स्थान दिलेले नाही. ‘विकासाच्या वाटेवर’ असा दावा करणाऱ्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भ निर्मितीच्या मार्गाचा उल्लेखच नाही. विदर्भाच्या विकासासाठी काँग्रेसने विदर्भ वैधानिक विकास मंडळाला आणखी सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवाय नागपूर येथे कृषी निर्यात हब स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे वेगळ्या विदर्भासंदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या एका नेत्याने पक्षश्रेष्ठींकडे केली होती. परंतु वेगळ्या विदर्भाला काँग्रेसने नकारच दिला आहे.
तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाने जोर धरला आहे. अगदी स्थानिक स्तरापासून ते इंटरनेटच्या ‘ग्लोबल’ चावडीपर्यंत ही मोहीम जोर धरते आहे. विधानसभा निवडणुकांदरम्यान विदर्भ हाच प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे, अशी ठोस भूमिका विदर्भवादी संघटनांनी घेतली आहे. विदर्भ विरोधक पक्ष व नेत्यांना विदर्भवादी जनता व कार्यकर्ते सळो की पळो करून सोडतील, असा इशाराच त्यांच्याकडून देण्यात आला होता. परंतु मोठ्या पक्षांनी वेगळ्या विदर्भाला जाहीरनाम्यात स्थानच न दिल्याने विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. निवडणुकांत विदर्भवाद्यांची नेमकी भूमिका काय राहणार यावर अनेक ठिकाणी मतांचे राजकारण अवलंबून राहणार आहे.(प्रतिनिधी)