महागाई विरोधात काँग्रेसनेते गटबाजी सोडून एकवटले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:07 IST2021-07-27T04:07:45+5:302021-07-27T04:07:45+5:30
नागपूर : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे सोमवारी संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ...

महागाई विरोधात काँग्रेसनेते गटबाजी सोडून एकवटले ()
नागपूर : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे सोमवारी संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस नेते गटबाजी विसरून एकत्र आलेले दिसले. पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री अनिस अहमद यांनी एकत्रित येत केंद्र सरकारविरोधात हल्लाबोल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला.
विशेष म्हणजे, शनिवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महापालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या विधानसभानिहाय आढावा बैठकींना नितीन राऊत अनुपस्थित होते. त्यावेळी पुन्हा एकदा गटबाजीची चर्चा रंगली होती. मात्र, सोमवारी राऊत यांचे पुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनात केदार- ठाकरेंनी हजेरी लावली. अ.भा. युवक काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र प्रभारी विजय सिंग राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेसतर्फे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. भाषण नही, राशन चाहिये, बाहुबली बनाने को व्हॅक्सीन चाहिये, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चामुळे संविधान चौक ते जीपीओ चौकापर्यंत मार्गावरील वाहतूक पोलिसांनी रोखली होती.
मोदी सरकारने १०० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सरकारला सात वर्षे झाली तरी महागाई दररोज वाढत आहे. आता पेट्रोल व डिझेलने शंभरी पार केली आहे. नोकऱ्या देण्याऐवजी लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या जनविरोधी सरकारला खाली खेचल्याशिवाय लोकांना न्याय मिळणार नाही, असे मत या वेळी नेत्यांनी व्यक्त केले. यानंतर विभागीय आयुक्त प्राजक्त लवंगारे वर्मा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी आ. स.क्यू.जामा, नितीन कुंभलकर, अतुल कोटेजा, कुंदा राऊत, श्रीनिवास नालमवार, अजित सिंग, इरशाद शेख, आसिफ शेख, राहुल सिरिया, आशिष मंडपे, तनवीर विद्रोही, प्रणित जांभुळे, पीयूष वाकोडीकर, अनिरुद्ध पांडे आदींनी भाग घेतला.