नागपुरात गडकरींच्या समोर काँग्रेसचे नाना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:00 IST2019-03-13T22:58:08+5:302019-03-13T23:00:51+5:30
नागपुरात भाजपाचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गडचिरोली मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले डॉ. नामदेव उसेंडी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अ.भा. काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या देशभरातील २१ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील पाच नेत्यांची नावे असून यात पटोले व उसेंडी यांचा समावेश आहे.

नागपुरात गडकरींच्या समोर काँग्रेसचे नाना !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात भाजपाचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गडचिरोली मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले डॉ. नामदेव उसेंडी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अ.भा. काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या देशभरातील २१ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील पाच नेत्यांची नावे असून यात पटोले व उसेंडी यांचा समावेश आहे.
खैरलांजी प्रकरणातील आरोपींना मदत करण्याचा आरोप करीत दलित संघटनांनी पटोले यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवित पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मेल व टष्ट्वीट केले होते. तसेच बाहेरचा उमेदवार म्हणूनही काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध झाला होता. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या २१ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत पटोले यांचे नाव देण्यात आले. नागपूरसाठी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, डॉ. बबनराव तायवाडे इच्छुक होते. शेवटी पटोले यांनी बाजी मारली.
पटोले हे १९९९ ते २०१४ पर्यंत भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार होते. भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा- गोंदियातून ते अपक्ष लढत पराभूत झाले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत ते भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर त्यांनी उघडपणे टीका केली. भाजप नेत्यांवरही ताशेरे ओढले. यामुळे ते भाजपापासून दुरावले. नाराजीतून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला व भाजपालाही रामराम ठोकला. गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रचारात ते उघडपणे फिरले व नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या भंडारा- गोंदियाच्या पोटविडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना विजयी करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
डॉ.नामदेव उसेंडी २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना गडचिरोली-चिमूर क्षेत्रासाठी काँग्रेसने उतरविले. त्यांना साडेतीन लाख मते मिळाली. परंतु मोदी लाटेत त्यांना भाजपचे अशोक नेते यांनी सुमारे दीड लाख मतांनी पराभूत केले होते.