मुस्लीम समाजावर पकड ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न
By Admin | Updated: September 26, 2016 02:59 IST2016-09-26T02:59:52+5:302016-09-26T02:59:52+5:30
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विचारात घेता प्रदेश काँग्रेस समितीने आपला परंपरागत मतदार

मुस्लीम समाजावर पकड ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न
विभागनिहाय समित्या स्थापन : मुस्लीम नेते, डॉक्टर, वकील, उद्योजकांना भेटणार
नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विचारात घेता प्रदेश काँग्रेस समितीने आपला परंपरागत मतदार असलेल्या मुस्लीम समाजावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची योजना आखली आहे. यासाठी विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या मुस्लीम समाजातील विविध स्तरातील लोकांमध्ये जाऊन काँग्रेसचे ध्येय धोरण मांडतील, काँग्रेसने अल्पसंख्यांक विकासासाठी केलेल्या कामाची माहिती देईल व मुस्लीम समाजात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल. हे सर्व करताना मुस्लीम समाजाच्या वास्तविक स्थितीचा अभ्यासही केला जाणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अल्पसंख्यांक उपसमितीची बैठक झाली. तीत अल्पसंख्यांक मोर्चाच्या विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या. या समित्यांना आपल्या विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील १५ दिवस दौरा करून अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे. विभागीय समितीला प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अल्पसंख्यांक समाजातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करायची आहे. अल्पसंख्यांक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, इंजिनिअर, उद्योगपती व व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी काँग्रेसच्या धोरणांबाबत चर्चा करायची आहे.
समाजातील मौलाना, मदरसा पदाधिकारी यांच्याशीही चर्चा केली जाईल व काँग्रेसने आजवर अल्पसंख्यांक समाजासाठी केलेल्या कामाची माहिती दिली जाईल. सोबतच जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजाचे संमेलन व शिबिर आयोजित केले जाईल. या सर्वांशी चर्चा करून समोर येणारे प्रश्न व समस्यांचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला जाईल.
बूथ स्तरावर अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते तयार केले जातील. जिल्हा व तालुक्यातील राजकीय स्थितीचा अभ्यास केला जाईल.
यासाठी प्रत्येक विभागीय समितीमध्ये समिती प्रमुख व समन्वयकासह पाच ते सहा सदस्य नियुक्त करण्यात आले आहे. नांदेड व नागपुरात प्रत्येकी सहा सदस्य नियुक्त केले आहेत. (प्रतिनिधी)
अशा आहेत विभागनिहाय समित्या
नागपूर विभाग- समिती प्रमुख बाबा सिद्दीकी. उपप्रमुख नतकोद्दीन खतीब, सदस्य : ओवेस कादरी समन्वयक, एस. क्यू. जमा, जिया पटेल, मुजीब पठान .
अमरावती विभाग - समिती प्रमुख: माजी मंत्री अनिस अहमद, समिती समन्वयक: जब्बार शेख, सदस्य : शकूर नागानी, मो. नदीम, वजाहत मिर्झा.
औरंगाबाद विभाग - समिती प्रमुख: असलम शेख,
समन्वयक : अहमद हुसैन चाउस, सदस्य : एम. एम. शेख, भिवंडी के मो. अली खान, शेख इब्राहिम.
कोकण विभाग - समिती प्रमुख : खा. हुसैन दलवाई.
पश्चिम महाराष्ट्र - हाफीज धत्तुरे
उत्तर महाराष्ट्र - आ. आसिफ शेख
नांदेड विभाग - आ. आरिफ मोहम्मद नसीम खान