काँग्रेसने नेत्यांची गरिबी दूर केली : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:32 IST2019-04-04T23:31:03+5:302019-04-04T23:32:22+5:30
इंदिरा गांधी यांच्या सरकारपासून गरिबी हटावचा नारा काँग्रेस पक्ष देत आहे. या निवडणुकीत राहुल गांधी यांचाही तोच नारा आहे. ६० वर्षे देश हातात देऊनही देशातून गरिबी दूर केली नाही. काँग्रेस पक्षाने गरिबी दूर केली ती काँग्रेसच्या नेत्यांची आणि चेल्याचपाट्यांची, अशी परखड टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उत्तर नागपुरातील साभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोबत आ. डॉ. मिलींद माने, माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, विरेंद्र कुकरेजा व इतर.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी यांच्या सरकारपासून गरिबी हटावचा नारा काँग्रेस पक्ष देत आहे. या निवडणुकीत राहुल गांधी यांचाही तोच नारा आहे. ६० वर्षे देश हातात देऊनही देशातून गरिबी दूर केली नाही. काँग्रेस पक्षाने गरिबी दूर केली ती काँग्रेसच्या नेत्यांची आणि चेल्याचपाट्यांची, अशी परखड टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी उत्तर नागपुरात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला आ. डॉ. मिलिंद माने, माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, वीरेंद्र कुकरेजा, डॉ. विंकी रुगवानी, राजन वाघमारे, बाळू घरडे, नवनीतसिंग तुली आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान असताना ते म्हणायचे की मी दिल्लीतून एक रुपया पाठवायचो तर १५ पैसे जनतेला भेटायचे. पण भाजपाच्या सरकारने डीबीटी योजना सुरू करून, ८० हजार कोटी रुपयांच्या योजनेचा पूर्णपणे लाभ जनतेला मिळाला. उज्ज्वला योजनेतून गॅस, उजाला योजनेतून वीज, पंतप्रधान आवास योजनेतून घर गरिबांना भाजप सरकारने दिले. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशात ९८ टक्के शौचालय बांधण्यात आली. मुद्रा योजनेच्या माध्यमातून १२ कोटी लोकांना विनातारण कर्ज उपलब्ध झाले. याचा खऱ्या अर्थाने लाभ गरीब जनतेला झाला. काँग्रेसने बाबासाहेबांच्या नावावर राजकारण केले, सत्ता मिळविली. पण चैत्यभूमीजवळील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा काँग्रेसने दिली नाही. भाजपाच्या सरकारने अवघ्या तीन दिवसात ३४०० कोटी रुपयांची इंदू मिलची जागा स्मारकाला दिली. अलीपूरचे घर बाबासाहेबांचे स्मारक बनले, लंडनमधील बाबासाहेबांचे घर खरेदी केले. त्याचबरोबर अनुसूचित जातीचे आरक्षण, पदोन्नती, अॅट्रॉसिटी कायदा अडचणीत आला त्यावेळी आमच्या सरकारने समाजाचे प्रोटेक्शन केले. सामाजिक न्याय हा भाषणात मांडायचा नसतो, तो आपल्या कर्तृत्वात असावा लागतो. भाजपाने सत्तेत आल्यानंतर खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय घडवून आणल्याचे फडणवीस म्हणाले. निवडणूक आली की काँग्रेसवाले आरोप करतात की संविधान बदलतील, आरक्षण संपवतील, पण बाबासाहेबाचे संविधान इतके मजबूत आहे की, ते कुणीही बदलवू शकत नाही.
एअर स्टाईकसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एअर स्ट्राईकसंदर्भात जगात दोघांनाच शंका आहे. एक पाकिस्तान आणि दुसरी काँग्रेस. हल्ले झाले हे मोदींनी नाही सांगितले, ते सेनेच्या प्रमुखांनी सांगितले. पण काँग्रेसला सेनेच्या लोकांवरही भरवसा नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.
राजकारण हे समाजसेवेचे माध्यम : नितीन गडकरी
राजकारण हे केवळ सत्ताकारण नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे ,असा माझा विश्वास आहे. म्हणूनच गोरगरीब वंचितांच्या समस्यांना जो आपले मानतो आणि पोटतिडकीने यांच्या समस्या सोडवितो त्यालाच जनता स्वीकारते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. वसंतनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, समाजामध्ये अनेक समस्या आहेत, पण या समस्यांची जाण असणारी माणसे मात्र दुर्दैवाने कमी आहेत. मी ज्या संस्कारात आणि परिवारात वाढलो, ज्या पक्षाने आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम केले, त्या अनेक जिव्हाळ्याच्या माणसांमुळे मी लोककल्याणकारी कामे करू शकलो. त्यामुळे आपल्याला चिंता नसून नागपूरच्या जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. सुधाकर कोहळे, माजी खा. प्रकाश जाधव, माजी आ. मोहन मते, किशोर कुमेरिया, रमेश सिंगारे, विशाखा बांते, भारती बुंडे, वंदना भगत आदी उपस्थित होते.