काँग्रेस एकवटली, ऊर्जा मिळाली

By Admin | Updated: December 9, 2015 03:23 IST2015-12-09T03:23:57+5:302015-12-09T03:23:57+5:30

महापालिका, जिल्हा परिषदेसह राज्य व केंद्रातही असलेली भाजपची सत्ता, त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपराजधानीत असलेले ...

Congress gathered, got energy | काँग्रेस एकवटली, ऊर्जा मिळाली

काँग्रेस एकवटली, ऊर्जा मिळाली

शहर व ग्रामीणमधून जोरदार प्रतिसाद : मनपा, जिल्हा परिषदेसाठी मिळाले बळ
नागपूर : महापालिका, जिल्हा परिषदेसह राज्य व केंद्रातही असलेली भाजपची सत्ता, त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपराजधानीत असलेले प्रभुत्व यामुळे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे निराशा आली होती. भविष्यातही नागपूर शहर व जिल्ह्यात काँग्रेसचा ‘हात’ उंचावेल की नाही, अशी शंका काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या मनात होती. मात्र, मंगळवारी विधानभवनावर काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या विराट मोर्चाला नागपूर शहर व जिल्ह्यातील लोकांनी दिलेल्या जोरदार प्रतिसादामुळे काँग्रेसला ऊर्जा मिळाली आहे.
नागपूर शहर व ग्रामीणमधील प्रत्येक मतदारसंघातून मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. विशेष म्हणजे या मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेसच्या शहर व जिल्ह्यातील नेत्यांमध्ये समन्वय असल्याचे पाहायला मिळाले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी शहरातील नियोजन केले. माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, प्रफुल्ल गुडधे, अभिजित वंजारी या विधानसभेतील उमेदवारांसह ग्रामीणमध्ये आ. राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, युवक काँग्रेसच्या लोकसभा अध्यक्ष कुंदा राऊत यांनी मोर्चा सांभाळला. अतुल कोटेचा, मुन्ना ओझा, मुजीब पठाण, नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, दीपक वानखेडे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. शहर व ग्रामीणच्या नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविली होती. नेते लक्ष ठेवून होते. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आपापल्या भागातील लोकांसह मोर्चात सहभागी झाले. प्रत्येक वॉर्ड व गावातून लोक आणण्यात आले. सकाळी ११ पासून मोर्चेकरी दीक्षाभूमी परिसरात जमण्यास सुरुवात झाली. दीक्षाभूमीच्या सभोवतालचे सर्व रस्ते भरगच्च भरले होते.
मोर्चा यशस्वी झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मोर्चानंतर काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास दुनावला होता. वर्षभरानंतर महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. शहर व जिल्ह्यात वाढलेली भाजपची ताकद पाहता या निवडणुकांमध्ये यश मिळेल की नाही, याची शंका काँग्रेस नेत्यांना होती.
मात्र, या मोर्चामुळे हवा बदलत असल्याचा अंदाज काँग्रेस नेत्यांना आला असून नवीन वर्षात अधिक जोमाने तयारीला लागण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

सारे काही शिस्तीत
लाखो लोक सहभागी झालेल्या या मोर्चात कमालीची शिस्त पाहायला मिळाली. दीक्षाभूमी चौकातून दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास निघालेला हा मोर्चा २.३० वाजता मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट येथे पोहोचला. यानंतर येथे नेत्यांची भाषणे झाली, आणि सायं. ४.३० वाजताच्या सुमारास सर्व मोर्चेकरी परतीच्या मार्गाला लागले. परंतु या चार तासात कुठेही काही गडबड झाली नाही. शेवटपर्यंत सर्व काही शांततेत पार पडले. मंचाजवळील बस स्टॉपच्या शेडवर चढून एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी शिस्तभंग करण्याचा प्रयत्न केला. नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कानउघाडणी करून खाली उतरविले.
तीन माजी मुख्यमंत्री एकत्र
मोर्चाच्या निमित्ताने राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री व्यासपीठावर एकत्र आले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे व पृथ्वीराज चव्हाण या तिन्ही नेत्यांनी सरकारच्या धोरणावर सडेतोड प्रहार करीत, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली.
युवक काँग्रेसने भरला जोश
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांनी यूथ काँग्रेसचे झेंडे हातात घेऊन विधानभवनावर धडक दिली. युवक कार्यकर्त्यांनी मोर्च्यामध्ये जोश भरला. त्यांचा जोश इतर मोर्चेकऱ्यांना स्फूर्ती देण्याचे काम करीत होता. या माध्यमातून युवक काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केले.
महिला नेतृत्वाचा पुढाकार
मोर्चात काँग्रेसच्या महिला नेत्या आघाडीवर होत्या. महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस, माजी मंत्री वर्षा गायकवाड, आ. यशोमती ठाकूर, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्ष सुनीता गावंडे यांच्या नेतृत्वात हजारो महिलांनी या मोर्चात भाग घेतला होता. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन राज्य सरकारविरुद्ध घोषणा देत होत्या.
नियोजन फत्ते, प्रदेशाध्यक्षांकडून आभार
मोर्चासाठी राज्यभरातून लोक येणार होते. शिवाय नागपूर शहर व ग्रामीणमधूनही मोठ्या संख्येने लोक येणार होते. यासाठी शहर व ग्रामीण काँग्रेसने नियोजन केले होते. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नियोजनाखाली शहरात दाखल होणाऱ्या मोर्चेकऱ्यांचा रुटमॅप निश्चित करण्यात आला होता. मोर्चाचे भव्य स्वरूप पाहून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी उत्तम नियोजनासाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांचे भाषणाच्या सुरुवातीलाच जाहीर आभार मानले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
काँग्रेसच्या या मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. दीक्षाभूमी चौकापासून तर मोर्चेस्थळापर्यंत हजारो पोलीस शिपाई तैनात करण्यात आले होते. या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो लोक आल्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी झाली. बर्डीवरील व्हेरायटी चौकातील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे अनेक ठिकाणी जामसारखी स्थिती निर्माण झाली होती. यात महाराज बाग चौकात मोठा जाम लागला होता. पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.

Web Title: Congress gathered, got energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.