डबल ए-बी फॉर्ममुळे काँग्रेस संकटात
By Admin | Updated: February 6, 2017 01:52 IST2017-02-06T01:52:07+5:302017-02-06T01:52:07+5:30
महापालिकेच्या निवडाणुकीसाठी काँग्रेसतर्फे सुमारे १० जागांवर डबल ए-बी फॉर्म देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

डबल ए-बी फॉर्ममुळे काँग्रेस संकटात
छाननीत दुसरा ए-बी फॉर्म रद्द पण रिगणातून माघार घेणार का ? १० जागांवर वाढणार डोकेदुखी
नागपूर : महापालिकेच्या निवडाणुकीसाठी काँग्रेसतर्फे सुमारे १० जागांवर डबल ए-बी फॉर्म देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक विभागाच्या छाननीत दुसरा ए-बी फॉर्म रद्द ठरले. मात्र, संबंधित उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात कायम आहेत. आता या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे.
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यातील रस्सीखेचामुळे उत्तर नागपुरात सर्वाधित सात जागांवर डबल ए-बी फॉर्म देण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये मीना यादव व प्रियंका सावलानी, प्रभाग २ मध्ये दिनेश यादव, दिलीप रोडे, गोपाल यादव अशा तिघांना, प्रभाग ३ मध्ये सुनिता ढोले व साहिना मोहम्मद अन्सारी, प्रभाग ४ मध्य सत्त्वशिला काळे व कल्पना गोस्वामी, प्रभाग ५ मध्ये मंगेश सातपुते व शंकर देवगडे, प्रभाग ७ मध्ये विजय कराडे व जाहिदा बेगम हमीद ्अन्सारी तर प्रभाग ९ मध्ये किशोर जिचकार व विनील चौरसिया (लोकमंच) यांना ए-बी फॉर्म देण्यात आले.
डबल ए-बी फॉर्म देण्यात आल्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर उत्तर नागपुरातील उमेदवारांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. आपली उमेदवारी अधिकृत ठरावी यासाठी सर्वांनीच जोरात प्रयत्न केले. मात्र, निवडणूक विभागातर्फे मुदतीत पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे पत्र सादर करणारा व पत्र नसेल तर प्रथम अर्ज सादर करणारा उमेदवार अधिकृत उमेदवार ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले. शनिवारी निवडणूक विभागाने केलेल्या छाननीत मीना यादव, दिनेश यादव, सुनीता ढोले, सत्त्वशिला काळे, मंगेश सातपुते, विजय कराडे व किशोर जिचकार यांची उमेदवारी अधिकृत ठरविण्यात आली. या सर्व उमेदवारांना काँग्रेसचे पंजा चिन्ह मिळणार आहे.
मात्र, या सर्व जागांवर दुसरा ए-बी फॉर्म जोडून अर्ज सादर करणारे उमेदवारही कायम आहेत. संबंधित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही तर या जागांवर काँग्रेसचा एक अधिकृत उमेदवार व विरोधात बंडखोर उमेदवार असे चित्र पहायला मिळू शकते. तसे झाले तर गटबाजी आणखी उफाळून येऊन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढू शकते. याचा फायदा रिंगणातील तिसऱ्या उमेदवाराला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता ए-बी फॉर्म रद्द झालेल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचे आव्हान काँग्रेस नेत्यांसमोर आहे.(प्रतिनिधी)
राऊत यांनी केली प्रदेश काँग्रेसकडे तक्रार
४उत्तर नागपुरात तब्बल सात जागांवर उमेदवारांना डबल ए-बी फॉर्म देण्यात आल्याची तक्रार माजी मंत्री नितीन राऊत यांनी प्रदेश काँग्रेसकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.
लोकमंचची जिचकारांना ना
प्रभाग ९ (ब) च्या जागेवर लोकमंचचे विनिल चौरसिया व काँग्रेसचे किशोर जिचकार या दोघांनी काँग्रेसतर्फे ए-बी फॉर्म देण्यात आला होता. जिचकार यांनी प्रथम अर्ज दाखल केल्यामुळे ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरले. मात्र, लोकमंचने जिचकार यांना प्रचारात सोबत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमंचचे बब्बी बाबा यांनी सांगितले की, प्रभाग ९ मध्ये लोकमंचला तीन जागा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आपल्यासह (बब्बी बाबा) हिमांद्री थूल व विनिल चौरसिया यांना ए-बी फॉर्म देण्यात आले. यानंतर काँग्रेसने दगा करीत किशोर जिचकार यांनाही चौरसिया यांच्याच जागेवर ए-बी फॉर्म दिला. या प्रकारामुळे लोकमंचचे नेते अटलबहादूर सिंग नाराज झाले आहेत. त्यामुळे जिचकार यांनी अर्ज मागे घ्यावा अन्यथा लोकमंचचे उमेदवार त्यांना प्रचारात सोबत घेणार नाहीत. चौरसिया यांचाच प्रचार करतील, असा इशारा बब्बी बाबा यांनी दिला आहे. या प्रकाराची आपण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.