शहर काँग्रेसची भूमिका संशयास्पद : सहा दिवसानंतरही अहवालाची प्रतीक्षाच नागपूर : महापालिकेच्या निवडणुुकीत भाजपाने काँग्रेसचा पुरता सफाया केला. भाजपाने तब्बल १०८ जागांवर झेप घेतली. काँग्रेस २९ वर खाली घसरली. एवढे झाल्यानंतरही आशीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या मदतीने भाजपाचा सभापती निवडून आला. भाजपला साथ देणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर पक्षातर्फे अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. या नगरसेवकांना शहर काँग्रेसतर्फे अभय दिल्याचे चित्र आहे. आशीनगर झोनमध्ये काँग्रेसचे संदीप सहारे, मनोज सांगोळे, भावना लोणारे, दिनेश यादव, नेहा निकोसे, परसराम मानवटकर हे सहा नगरसेवक विजयी झाले आहेत. येथे बसपाचे सात तर भाजपाचे फक्त तीन सदस्य आहेत. झोन सभापतीच्या निवडणुकीत येथे काँग्रेसने भाजपाला मतदान केले. त्यामुळे भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे विजयी झाल्या. माजी मंत्री नितीन राऊत यांचे समर्थक मानले जाणारे संदीप सहारे मतदानाला अनुपस्थित होते. काँग्रेसने तठस्थ भूमिका घेतली असती तर बसपाचा सभापती विजयी झाला असता. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून धोबीपछाड झाल्यानंतर काँग्रेसने भाजपालाच साथ द्यावी, यावर राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी असा निर्णय घेताना शहर काँग्रेसला विश्वासात घेतले का, केवळ भाजपाच्या सत्तेचा उपयोग करता यावा, निधी मिळावा यासाठी एवढा मोठा विरोधाभासी राजकीय निर्णय घेण्यात आला का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे भाजपाला थेट साथ देण्याचा ठपका काँग्रेसवर लागला असून यावर आता काँग्रेसला वेळोवेळी उत्तर द्यावे लागणार आहे. शहर अध्यक्षांच्या कोंडीचे संकेत भाजपाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर कारवाई करणार का, अशी विचारणा करता शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांना या संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येताच योग्य ती कारवाई केली जाईल. नगरसेवकांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला, निवडणुकीदरम्यान बसपाकडून काँग्रेस नगरसेवकांना डिवचण्यात आले होते का, काँग्रेसबाबत शेरेबाजी करण्यात आली होती का, आदी सर्व पैलू तपासून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एरवी आक्रमक भूमिका घेणाऱ्या ठाकरे यांनी याप्रकरणी तडकाफडकी कारवाई का केली नाही, असा प्रश्न पक्षांतर्गत विरोधकांतर्फे उपस्थित केला जात आहे. या घटनाक्रमावरून येत्या काळात ठाकरे यांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रदेश काँग्रेसकडे तक्रार झोन सभापती निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला मतदान केले. यामुळे काँग्रेसची पार इज्जत गेली. काँग्रेस भाजपला शरण जाणार असेल तर काँग्रेसचा जनाधार कसा वाढणार, असे प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसच्या एका गटाने या प्रकरणाची प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष भाजप विरोधात राज्यभर संघर्ष यात्रा काढतात. तर दुसरीकडे मुख्यमनंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरात भाजपाला पद मिळवून देण्यासाठी काँग्रेस हातभार लावते. यातून राज्यात चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे या प्रकरणी जबाबदार नगरसेवकांवर तसेच त्यांना अभय देणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.