शिक्षक मतदार संघात काँग्रेस कोमात

By Admin | Updated: January 12, 2017 01:39 IST2017-01-12T01:39:38+5:302017-01-12T01:39:38+5:30

नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असताना काँग्रेसमध्ये सारेकाही सामसूम आहे.

Congress Comat in teacher voter's constituency | शिक्षक मतदार संघात काँग्रेस कोमात

शिक्षक मतदार संघात काँग्रेस कोमात

उमेदवारीबाबत अद्याप निर्णय नाही : राष्ट्रवादीला समर्थन देण्याचा विचार
नागपूर : नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असताना काँग्रेसमध्ये सारेकाही सामसूम आहे. पक्षाचा उमेदवार लढणार की कुणाला समर्थन देणार हे सर्व गुलदस्त्यात आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. काँग्रेस नेत्यांनी याबाबत कुठलीही भूमिका जाहीर न केल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी नाईलाजास्तव समविचारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा विचार मांडला आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी होऊ शकली नाही. याचा फटका राष्ट्रवादीला बसला. त्यामुळे आता शिक्षक मतदारसंघही काँग्रेस रिंगणात उतरेल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे होताना दिसत नाही.
नागपूर शिक्षण मतदार संघावर विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या रूपात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सलग तीन टर्म वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे बळ मिळत असल्याने विमाशीचे उमेदवार निवडून यायचे असे बोलले जाते. २०१० च्या निवडणुकीत काँग्रेसचे समर्थन देऊनही डायगव्हाणे यांना मात खावी लागली. भाजपचे नागो गाणार विजयी झाले. डायगव्हाणे यांच्या पराभवानंतर काँग्रेस विचारसरणीचे शिक्षक सक्रिय झाले. काँग्रेसचा स्वतंत्र शिक्षक सेल स्थापन करण्यात आला. या सेलच्या माध्यमातून बरेच काम करण्यात आले. त्यामुळे आता काँग्रेस शिक्षक सेलचा उमेदवार रिंगणात उतरेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. उमेदवारीसाठी पुरुषोत्तम पंचभाई, अनिल शेंडे, जयंत जांभूळकर यांच्या नावाचीसुद्धा चर्चा होती.
मात्र, पक्षाकडून उमेदवार लढविण्यासाठी हालचालीच झाल्या नाहीत. यामुळे काँग्रेस शिक्षक सेलमध्ये नाराजी पसरली आहे.
३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. काँग्रेसकडे आता वेळ कमी आहे. निवडणुकीत उमेदवार लढवायचे की कुणाला समर्थन द्यायचे, याबाबत मार्गदर्शन मागविणारा प्रस्ताव काँग्रेस शिक्षक सेलच्या जिल्हा संघटनेने प्रांतीय अध्यक्ष मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. मात्र, त्यांच्याकडूनही कुठलाच निर्णय आला नाही. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीला समर्थन देण्याचा ठराव
ज्येष्ठ नेत्यांनी कुठलेही दिशानिर्देश न दिल्यामुळे शेवटी मंगळवारी काँग्रेस शिक्षक सेलच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उपाध्यक्ष सिद्धार्थ ओंकार यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. या बैठकीत सचिव बाळा आगलावे यांनी कुणाला समर्थन द्यायचे, या संबंधीचा प्रस्ताव चर्चेला ठेवला. चर्चेअंती जिल्हा संघटनेने समविचारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार खेमराज कोंडे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला, असे आगलावे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेस शिक्षक सेलच्या या निर्णयामुळे विमाशीचे उमेदवार आनंद कारेमोरे यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Congress Comat in teacher voter's constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.