जिल्हा प्रभारींवर काँग्रेसचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 02:21 IST2016-06-18T02:21:14+5:302016-06-18T02:21:14+5:30

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी प्रत्येक जिल्ह्यातील होतकरू नेत्यांना प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत संधी दिल्यानंतर

Congress charge in district charge | जिल्हा प्रभारींवर काँग्रेसचा भार

जिल्हा प्रभारींवर काँग्रेसचा भार

वडेट्टीवार नागपूरचे पालक पदाधिकारी : झिया पटेल, रवींद्र दरेकर व विनोद जैन जिल्हा प्रभारी
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी प्रत्येक जिल्ह्यातील होतकरू नेत्यांना प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत संधी दिल्यानंतर आता नेत्यांच्या माध्यमातून लगतच्या जिल्ह्यांमध्ये पक्षबांधणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पालक पदाधिकारी व दोन ते तीन जिल्हा प्रभारी नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या नेत्यांना संबंधित जिल्ह्यात नियमित जाऊन बैठका, आढावा घेण्याची सक्तीही करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यासाठी पालक पदाधिकारी म्हणून माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर नागपूर शहर प्रभारी म्हणून प्रदेश काँग्रेसचे सचिव व झिया पटेल (भंडारा), रवींद्र दरेकर (गडचिरोली) व विनोद जैन (गोंदिया) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागपूर जिल्हा ग्रामीणचे प्रभारी म्हणून वरुडचे माजी आ. नरेश ठाकरे हे जबाबदारी पार पाडतील.
पालक पदाधिकारी हे संबंधित जिल्ह्यातील काँग्रेसचे पालक म्हणून काम करतील. स्थानिक शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना विश्वासात घेऊन त्यांच्या माध्यमातून पक्षसंघटना बळकट करण्यासाठी उपाय योजण्याची जबाबदारी पालक पदाधिकाऱ्यांवर असेल. तर, जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेल्या नेत्यांना त्या शहर किंवा जिल्हा ग्रामीणमधील अध्यक्ष व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून पक्षाची ध्येय, धोरणे राबवावी लागतील. हे प्रभारी प्रदेशाध्यक्षांसाठी जिल्ह्यातील दुवा म्हणून काम करतील. सोबतच स्थानिक पातळीवर असलेल्या गटबाजीवर नियंत्रण ठेवून त्यावर उपाय योजनेचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सोपवतील. ज्या ठिकाणी महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तेथे पालक पदाधिकारी व जिल्हा प्रभारींना स्थानिक अध्यक्षांना पूर्ण ताकदीने मदत करावी लागणार आहे. निवडणुकीसाठी होणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती, अर्ज वितरण, नेत्यांच्या बैठका, कार्यकर्त्यांची शिबिरे आदींचे नियोजन करण्याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर असेल.
माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष नितीन राऊत हे भंडारा, गोंदिया व वर्धा जिल्ह्याचे पालक पदाधिकारी राहतील. भंडारा जिल्हा काँग्रेसच्या प्रभारीपदी प्रदेश सचिव प्रफुल गुडधे, मुजिब पठाण व आसावरी देवतळे यांची नियुक्ती केली आहे. वर्धा जिल्हा प्रभारीपदी बंडू सावरबांधे, अतुल कोटेचा यांची तर चंद्रपूर जिल्हा प्रभारीपदी एस.क्यू. जामा, प्रमोद तितिरमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश सचिव सुरेश भोयर व योगेंद्र्र भगत यांना गडचिरोलीचे प्रभारी तर बबनराव तायवाडे व उमाकांत अग्निहोत्री यांना गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress charge in district charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.