“जनविरोधी भाजपला घालवून काँग्रेस पक्षाचे सरकार आणा”; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:49 PM2023-12-11T17:49:03+5:302023-12-11T17:50:49+5:30

Congress Balasaheb Thorat News: केंद्रातील भाजप सरकार गेली ९.५ वर्ष लोकशाहीची पायमल्ली करत कारभार करत आहे, अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली.

congress balasaheb thorat slams state govt and bjp central govt in hallabol morcha | “जनविरोधी भाजपला घालवून काँग्रेस पक्षाचे सरकार आणा”; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

“जनविरोधी भाजपला घालवून काँग्रेस पक्षाचे सरकार आणा”; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

Congress Balasaheb Thorat News: महागाई प्रचंड असून जनतेला जगणे कठीण झाले आहे, शिक्षण झाले तरी तरुणांना नोकरी मिळत नाही, जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. शेतकरी, कामगारांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. हे सरकार आश्वासने भरपूर देते पण पूर्तता करत नाही. वीमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवून लुटत आहेत पण सरकार त्यावर काहीच करत नाही. केंद्रातील भाजप सरकार गेली ९.५ वर्ष लोकशाहीची पायमल्ली करत कारभार करत आहे. महाराष्ट्रातही तोडफोड करुन सरकार आणले आहे. आता या सरकारला घालवले पाहिजे. महाराष्ट्रातील भाजप सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणायचे आहे, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दिक्षाभूमी ते विधानभवन असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात या मोर्चात हजारो लोकांनी सहभाग घेतला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारवर सडकून टीका केली. भाजपा सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्र आज गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दंगली घडवण्यात देशात एक नंबरवर आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही, बेरोजगारांची थट्टा चालवली आहे. शिक्षण भरतीचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जात आहेत पण सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

महाराष्ट्रातही काँग्रेसची लाट आहे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तिसगड व मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमाभागात काँग्रेस पक्षाला मोठे जनसमर्थन मिळालेले आहे. या भागातून ७५ ते १०० टक्के काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, महाराष्ट्रातही काँग्रेसची लाट आहे हे लक्षात घ्या. भाजप म्हणते तीन राज्यात जिंकलो मग हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावून दाखवा. जनता भाजपाच्या विरोधात आहे हे भाजपालाही माहित आहे म्हणून ते निवडणुकीला घाबरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तिसगडमध्ये धानाला ३१०० रुपये भाव व एक हजार बोनस देण्याची तसेच ४५० रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा करता मग महाराष्ट्रात का देत नाही याचे उत्तर भाजपा सरकारला द्यावे लागेल. हल्ला बोल मोर्चा हा सरकारला एक इशारा आहे हे लक्षात ठेवा. शेतकरी, बेरोजगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा एल्गार नाना पटोले यांनी केला.

दरम्यान, तेलंगणात काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या आणि जनतेने काँग्रेसला भरघोस मतदान करून सत्तेत आणले, कर्नाटकातही काँग्रेसने गॅरंटी दिल्या होत्या व तेथेही काँग्रेसचे सरकार आले आता महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार आणू. बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे पण सरकारने पाच वर्षात नोकर भरती केली नाही. MPSC च्या परिक्षा होत नाहीत, गावात वीज नाही, पाणी नाही, शेती संकटात आहे. बरोजगार, शेतकरी, महिला, शेतमजूर, सफाई कामगारांचे प्रश्न आहेत. सरकारमधील मंत्री एकमेकाविरोधात बोलत आहेत. आजचा हा मोर्चा फक्त काँग्रेसचा नसून जनतेचा आक्रोश दाखवणारा आहे आणि या हल्लाबोल मोर्चामुळे झोपी गेलेले सरकार जागे होईल, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला.
 

Web Title: congress balasaheb thorat slams state govt and bjp central govt in hallabol morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.