ओसीडब्ल्यू व दहनघाट लाकूड घोटाळ्यावरून काँग्रेस आक्रमक
By Admin | Updated: April 30, 2016 03:01 IST2016-04-30T03:01:29+5:302016-04-30T03:01:29+5:30
ओसीडब्ल्यू या पाणीपुरवठा कंपनीतर्फे नागरिकांची लूट होत असतानाही या कंपनीवर कारवाई का केली जात नाही,

ओसीडब्ल्यू व दहनघाट लाकूड घोटाळ्यावरून काँग्रेस आक्रमक
आयुक्तांना दीड तास घेराव : महेश ट्रेडिंगला काळ्या यादीत टाका
नागपूर : ओसीडब्ल्यू या पाणीपुरवठा कंपनीतर्फे नागरिकांची लूट होत असतानाही या कंपनीवर कारवाई का केली जात नाही, तसेच दहनघाटांवर लाकूड पुरवठ्यात घोटाळा करणाऱ्या महेश ट्रेडिंग कंपनीला काळ्या यादीत टाकून कंत्राटदारावर गुन्हा दाखल का केला जात नाही, असे प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसने शुक्रवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना तब्बल दीड तास घेराव घातला. या दोन्ही मुद्यांवर आठवडाभरात आयुक्तांनी निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी दुपारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कक्षात धडकले. घोटाळेबाजांना कुणाच्या दबावाखाली संरक्षण दिले जात आहे, असा सवाल करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. ठाकरे म्हणाले, दहनघाटावरील लाकूड पुरवठ्यात महेश ट्रेडिंग कंपनीने घोटाळा केल्याचे लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. असे असतानाही दोन वर्षे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली नाही.
महापालिकेतर्फे नुकतेच संबंधित कंत्राटदाराची पोलिसात तक्रार करण्यात आली पण तक्रारीत कंत्राटदाराने नुकसान भरपाई दिल्याचा उल्लेख करण्यात आला. एका कंत्राटदाराला वाचविण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने कुणाच्या दबावात घेतली, असा सवाल ठाकरे यांनी केला. महेश ट्रेडिंग कंपनीच्या नोंदणीत असलेला पत्ता व दहनघाट घोटाळ्यातील कंत्राटदाराचा पत्ता १४४, परिणय अपार्टमेंट असा दिला आहे.
नगरसेवक परिणय फुके यांचा महापालिकेच्या डायरीतही हाच पत्ता दिला आहे. यावरून फुके यांचा या घोटाळ्याची संबंध असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे फुके यांचे सदस्यत्व रद्द करावे व महेश ट्रेडिंग कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. शनिवारपर्यंत यावर निर्णय घेतला नाही तर महापालिकेवर प्रेतयात्रा काढली जाईल, असा इशारा ठाकरे यांनी दिला. यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महेश ट्रेडिंगला ब्लॅक लिस्ट केले जाईल व यापुढील निविदा प्रक्रियेत भाग घेऊ दिला जाणार नाही, असे आश्वस्त केले. (प्रतिनिधी)
ओसीडब्ल्यूवर नाराजी
नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, दीपक कापसे, सरस्वती सलामे, नयना झाडे, सुजाता कोंबाडे, अरुण डवरे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, दीपक वानखेड, तानाजी वनवे, इंदू ठाकूर आदींनी त्यांच्या भागात ओसीडब्ल्यूतर्फे नियमित पाणीपुरवठा होत नसून नागरिकांना भरमसाट बिल पाठविण्यात येत असल्याची तक्रार केली. संबंधित भरमसाठ बिले विकास ठाकरे यांनी आयुक्तांकडे सादर केली. लक्ष्मीनगर झोनमध्ये फक्त तीन टँकर सुरू आहेत. फ्लॅटस्कीममध्ये नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. तरीही बिल येत आहे, असे त्यांनी सांगितले. ही बिले पाहून आयुक्त हर्डीकर यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना फटकारले व या बिलात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. नगरसेवकांच्या पाणीपुरवठ्याबाबत असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी ओसीडब्ल्यूचा कर्मचारी, महापालिकेचा कर्मचारी व नगरसेवकाचा प्रतिनिधी अशी समिती तयार करावी, या समितीने पाणीपुरवठ्याचा आढावा घ्यावा, असे निर्देश आयुक्तांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना दिले. यानंतरही पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी कायम राहिल्या तर ओसीडब्ल्यूवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आंदोलकांना आश्वस्त केले.
वाढील बिल भरू नका
ओसीडब्ल्यूतर्फे नागरिकांना भरमसाट बिल पाठविले जात आहे. नागरिकांनी बिल भरले नाही म्हणून त्यांना धमकावले जाते व पाणीपुरवठा खंडित केला जातो. पाणी वापरले नसतानाही नागरिक धास्तीपोटी बिल भरत आहेत. नागरिकांना असे वाढीव बिल आले तर त्यांनी ते भरू नये. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात ते आणून द्यावे. आपण त्यांच्यावतीने आयुक्त व ओसीडब्ल्यूला जाब विचारू, बिल कमी करण्यासाठी संघर्ष करू, असे आवाहन विकास ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.