केंद्राच्या आदेशाने लसीकरण केंद्रांवर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:10+5:302021-04-05T04:07:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सची लसीकरण नोंदणी तत्काळ बंद करा, असे आदेश केंद्र ...

केंद्राच्या आदेशाने लसीकरण केंद्रांवर गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सची लसीकरण नोंदणी तत्काळ बंद करा, असे आदेश केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने काढले आहेत. यामुळे रविवारी लसीकरण केंद्रांवर चांगलाच गोंधळ उडाला. नोंदणी केलेले, पण आतापर्यंत लसीकरण न करणारे आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्सना लसीकरण केंद्रांवरून लस न घेताच परतावे लागले. विशेष म्हणजे काही लसीकरण केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय आरोग्य विभागाच्या या आदेशाबाबत माहिती नसल्याने गोंधळ उडाला होता.
पहिल्या टप्प्यात शहरात १६ जानेवारीपासून आरोग्य सेवकांचे, तर २ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले. केंद्र सरकारने लसीकरणासाठी एक प्रणाली सुनिश्चित केली आहे. त्यानुसार लसीकरण केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्सच्या नावाची नोंदणी सरकारी पोर्टलवर करणे शक्य होते. परंतु केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी अचानक आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी बंद करण्याचे आदेश काढले. आदेश काढण्यापूर्वीच आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्स यांची नोंदणी करता येणार नाही, अशी तजवीज संगणकीय प्रणालीत केली. त्यामुळे शनिवारी सायंकाळीही लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्सना लस न घेताच परतावे लागले.
सर्वच लसीकरण केंद्रांवरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन आले. त्यामुळे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना शनिवारीच ही माहिती मिळाली. परंतु अनेकजण याबाबत अनभिज्ञ होते. त्यामुळे रविवारी सकाळीही त्यांना संगणकीय प्रणालीचा त्रास सहन करावा लागला. काही केंद्रांवर आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्सच्या नावांची नोंदणी होत नसल्याने, इतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील नागरिकांचीही गर्दी झाली. अखेर लसीकरण केंद्रांवरील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्हॉट्स अपद्वारे हे आदेश पाठविण्यात आले. त्यानंतर नागरिकांचे लसीकरण सुरू झाले.
..
नोंदणी झालेल्या आरोग्य सेवकांना मिळणार लस
महापालिकेने १४ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून नोंदणी यापूर्वीच केली आहे. परंतु यातील अनेकांनी अजूनही लस घेतली नाही. नोंदणी झाली असल्याने या सर्वांना लस घेता येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. नाव नोंदचीणी प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करणारे पोलीस व इतर विभागातील फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य सेवकांंना लस घेता येईल. मात्र आता आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स यांची नोंदणी होणार नसल्याचे जोशी म्हणाले.