नागपुरात शाळा सुरू करण्यावरून संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:13+5:302021-09-25T04:09:13+5:30

नागपूर : राज्य सरकारने ४ ऑक्टाेबरपासून राज्यात शहर व ग्रामीण क्षेत्रातील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी प्रदान ...

Confusion over starting a school in Nagpur | नागपुरात शाळा सुरू करण्यावरून संभ्रम

नागपुरात शाळा सुरू करण्यावरून संभ्रम

नागपूर : राज्य सरकारने ४ ऑक्टाेबरपासून राज्यात शहर व ग्रामीण क्षेत्रातील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी प्रदान केली. या निर्णयानंतरही नागपूर शहरात व ग्रामीण भागातील शाळा सुरू हाेणार की नाही, यावरून संभ्रमाची स्थिती कायम आहे.

जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयाला शासनाच्या जीआरची प्रत मिळाली नसल्याने संभ्रम कायम आहे. त्यामुळे आता साेमवारीच काही निर्णय हाेण्याची शक्यता आहे. सरकारच्या निर्णयानंतर लाेकमतने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना संपर्क केला असता त्यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती असल्याचे सांगितले पण शासन परिपत्रक प्राप्त न झाल्याची बाब नमूद केली. जीआर प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी जे निर्देश देतील त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत जिल्हाधिकारी आर. विमला यांना संपर्क केला असता त्यांनीही जीआरची प्रत अद्याप प्राप्त न झाल्याचे स्पष्ट केले. जाेपर्यंत शासनाचे दिशानिर्देश येत नाही ताेपर्यंत काेणताही निर्णय घेणे अशक्य असल्याचे त्या म्हणाल्या. गाईडलाईनमध्ये सर्वकाही स्पष्ट असते. सध्या नागपूर शहर व ग्रामीणमध्ये काेराेना संक्रमितांच्या केसेस नाहीच्या बराेबर आहेत पण रुग्णांची संख्या कमी अधिक हाेत असते. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही शासनाचा जीआर प्राप्त न झाल्याचे कारण देत जाेपर्यंत दिशानिर्देश येत नाही ताेपर्यंत निर्णय घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे साेमवारपर्यंत प्रतीक्षा करावीच लागणार आहे.

परिपत्रक झाले जारी

राज्य सरकारच्या निर्णयाच्या काही वेळानंतरच साेशल मीडियाच्या विविध प्लॅटफार्मवर ४ ऑक्टाेबरपासून शाळा सुरू हाेणाऱ्या असल्याचे शिक्षण विभागाकडून काढलेल्या परिपत्रकाच्या प्रती शेअर केल्या जात आहेत. लाेकमतने जिल्हाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना जीआरची प्रत सादर केली.

पालकांमध्येही संभ्रम

सरकारच्या निर्णयानंतर शहरातील विविध शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्क केला असता तेही संभ्रमाच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. काेराेना संक्रमण पूर्णपणे संपलेले नाही. मागील काही दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली. त्यामुळे सरकारने काेणत्या रिपाेर्टच्या आधारे शाळा सुरू केल्या, हे समजण्यापलिकडचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत काय उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले, याबाबत जीआरमध्ये स्पष्टता नसल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली.

Web Title: Confusion over starting a school in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.