गोवर-रुबेलाच्या‘कन्सेंट’बाबत पालकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:00 AM2018-11-28T11:00:17+5:302018-11-28T11:00:40+5:30

गोवर-रुबेला लसीकरणाला बुधवारपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. परंतु या मोहिमेला घेऊन पालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे.

Confusion among parents about Gower-Rubel's Concert | गोवर-रुबेलाच्या‘कन्सेंट’बाबत पालकांमध्ये संभ्रम

गोवर-रुबेलाच्या‘कन्सेंट’बाबत पालकांमध्ये संभ्रम

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकारी म्हणतात, पालकांच्या मंजुरीची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोवर-रुबेला लसीकरणाला बुधवारपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. परंतु या मोहिमेला घेऊन पालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. इंजेक्शन स्वरूपात ही लस असल्याने विद्यार्थ्यांपेक्षा पालकांमध्येच भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, अनेक खासगी शाळांनी लस देण्याबाबत पालकांना मंजुरी (कन्सेंट) पत्र भरून देण्याची अट घातल्याने यात आणखी भर पडली आहे. प्राप्त माहितीनुसार अनेक पालकांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभागाने ‘कन्सेंट लेटर’ची गरज नाही, वयोगटात बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही लस देण्यात येईल, असे सांगितले आहे.
गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत मंगळवार, २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, मौदा येथे झाला. बुधवार २८ नोव्हेंबरपासून नागपुरात या मोहिमेचा शुभारंभ होऊन लसीकरणाला सुरुवात होणार आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १० लाख ६१ हजार ६७२ लाभार्थ्यांची नोंद घेण्यात आली आहे. यात नागपुरातील ४,२१,४०८ शाळेतील मुले व ६२,७१६ अंगणवाडीतील मुलांचा समावेश आहे. महिन्याच्या ३० दिवसांत १५ दिवस शाळा तर १५ दिवस वसाहतींमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. दररोज एका शाळेच्या विद्यार्थ्यांना लस दिली जाईल. ही लस सुरक्षित असून पालकांनी आपल्या बाळाला लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागने केले आहे. या लसीकरणाला पालकांची ना नाही, परंतु त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारा सक्षम अधिकारी पुढे येत नसल्याने व जबाबदारी कुणी घेत नसल्याने पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. यातच खासगी शाळांनी लसीकरणाला पूर्णत: जबाबदार पालक राहणार, अशा स्वरूपातील ‘कन्सेंट लेटर’ लिहून घेणे सुरू केल्याने गोंधळ वाढला आहे.

कन्सेंट लेटर मागितले नाही
सर्व शाळांना गोवर-रुबेला लसीकरणाची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. पालकांकडून कन्सेंट लेटर भरून घ्या, अशा सूचना शाळांना दिल्या नाहीत.
-चिंतामण वंजारी,
शिक्षण अधिकारी (प्राथमिक)

लसीकरण सुरक्षित
९ ते १५ वयोगटातील मुलांना देणारे गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. प्रत्येकाने आपल्या मुलाला ही लस द्यावी. लसीकरण हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात अनुभवी व प्रशिक्षण प्राप्त परिचारिकांकडून केले जाईल. लस दोषमुक्त आहे. विशेष म्हणजे, एका विद्यार्थ्याला लस दिल्यानंतर तेच इंजेक्शन दुसºयाला देता येणार नाही, अशी सोय आहे.
-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक आरोग्य विभाग, नागपूर

लसीकरण का?
गोवरमुळे भारतात दरवर्षी ५० हजार जण मृत्युमुखी पडतात. गोवरमुळे रुग्णाच्या शरीरातील ‘अ जीवनसत्वा’चे प्रमाण खूप कमी होते. रुबेला हा गर्भवती मातेला झाल्यास तिचा गर्भपात होऊ शकतो. बालकास मोतिबिंदू, हृदयविकार, मतिमंदत्व, बहिरेपणा व शरीराची वाढ खुंटणे आदी आजार होऊ शकतात. रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. भावी पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी हे लसीकरण आवश्यक आहे.

Web Title: Confusion among parents about Gower-Rubel's Concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य