मनोमिलनाचा लागणार कस!
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T22:24:18+5:302015-07-25T01:13:29+5:30
सातारा तालुक्यात : दोन गटांतील अस्वस्थ कार्यकर्ते इरिला पेटलेत

मनोमिलनाचा लागणार कस!
सागर गुजर - सातारा -ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सातारा तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांचा सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील मनोमिलनाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायतींत दोन गटांची सत्ता आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील सत्ता संघर्षामुळे कार्यकर्ते भलतेच इरिला पेटले आहेत. तालुक्यातल्या २८ गावांत मनोमिलनाचा कस लागणार, हे आता स्पष्टच झाले आहे.
तालुक्यातील अलवडी, निसराळे, सायळी, वेचले, अंबवडे खुर्द, भोंदवडे, वावरदरे, कामथी, वळसे, यवतेश्वर, विजयनगर, आष्टे तर्फ परळी, परमाळे या तेरा ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात त्या-त्या भागातील स्थानिक नेतेमंडळींना यश आले असले तरी इतर ठिकाणी संघर्ष अटळ ठरणार आहे. खेड, जांभळेवाडी, सासपडे, फडतरवाडी, फत्यापूर, गजवडी, सोनापूर, दरे बुद्रुक, पिलाणी, निगडी तर्फ सातारा, संमगमाहुली, पांगारे, सोनगाव स. निंब, गवडी, कण्हेर, संभाजीनगर, शेळकेवाडी, आटाळी , कारंडवाडी, वर्ये, नागेवाडी, वेळे, बोरगाव, विलासपूर, शेंद्रे, डोळेगाव या गावांमध्ये संघर्ष अटळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व मानणारा वर्ग या गावांमध्ये जास्त आहे. साहजिकच या गावांमध्ये राष्ट्रवादी पक्षातील गटातटाचे राजकारण पेटल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही गटांचे अस्वस्थ कार्यकर्ते सत्तासंघर्षात गुंतले आहेत.
दोन्ही राजेंचा पाठिंबा मिळविण्याचा खटाटोप अनेक ठिकाणी सुरूअसल्याचे पाहायला मिळत आहे. खेड ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाची सत्ता अबाधित राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी फिल्डिंग लावलेली आहे. तर येथीलच दुसऱ्या गटाने खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थन मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रत्येक ठिकाणी मनोमिलनाच्या माध्यमातून सत्तास्थापन केली गेली असल्याने स्थानिक राजकारणात विशेष लक्ष न घालण्याचे धोरण खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठरविल्याचे चित्र आहे. १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यात पहिल्या टप्प्यामध्ये यश आले आहे. मात्र २८ गावांत संघर्ष चांगलाच पेटणार आहे. स्थानिक पातळीवरील इर्ष्याचया निवडणुकीसाठी कारणीभूत असल्याचे चित्र तालुक्यात सार्वत्रिक ठिकाणी पाहायला मिळते.
या इर्ष्येमुळे मनोमिलनाचा भलताच कस लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. साहजिकच निवडून आल्यानंतर कुठल्या वाड्यावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असेल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
नेते ‘सेम’ कार्यकर्त्यांमध्ये ‘गेम’
तालुक्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या जवळपास सर्वच ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात एकमेकांविरोधातील कार्यकर्त्यांचे नेते ‘सेम’ आहेत; पण कार्यकर्त्यांमध्येच पॉलिटिकल ‘गेम’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.