पिस्तूल, कट्ट्यासह घातक शस्त्रे जप्त
By Admin | Updated: July 6, 2015 03:09 IST2015-07-06T03:09:11+5:302015-07-06T03:09:11+5:30
पिस्तूल, देशी कट्ट्यासह घातक शस्त्रे घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या खतरनाक गुंडांना जरीपटका आणि हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली.

पिस्तूल, कट्ट्यासह घातक शस्त्रे जप्त
नागपूर : पिस्तूल, देशी कट्ट्यासह घातक शस्त्रे घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या खतरनाक गुंडांना जरीपटका आणि हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली.जरीपटक्यातील दयानंद पार्क परिसरात शनिवारी ८.३० वाजता गणेश बुटानी पंचधारे (वय ३५, रा. लष्करीबाग), शेखर धनराज सहारे (वय ४१, रा. बारसेनगर), राकेश महेंद्र बाराहाते आणि त्यांचे दोन साथीदार दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती जरीपटका पोलिसांना कळाली. पोलिसांनी लगेच धाव घेत पंचधारे आणि सहारेला पकडले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक कट्टा, एक जिवंत काडतूस आणि अॅक्टिव्हा जप्त करण्यात आली. त्यांचे तीन साथीदार पळून गेले.
अशाच प्रकारे नारा गाव ते कोराडी पॉवर हाऊस रोडवर प्रमोद जनकलाल छवले (वय २८, रा. बैरामजी टाऊन), सेलव्हेस्टर विनोद क्रिस्टोपर (वय २१, रा. मोतीबाग), राजकुमार तुळशीराम सिमनकर (वय ३०, रा. मोठा इंदोरा), अमोल शिशुपाल वालदे (वय १९, रा. शांतीनगर) तसेच रमेश विश्वकर्मा हे सर्व शनिवारी सायंकाळी ६.५० च्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. जरीपटका पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून तलवार, कोयता, चाकू, गुप्ती, स्प्लेंडर आणि ज्युपिटर या दोन दुचाक्या जप्त केल्या. ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटका पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. त्याचप्रमाणे हुडकेश्वर पोलिसांनी म्हाळगीनगर, पाण्याचे टाकीजवळ रोहित उर्फ राज संगिता वाहने (वय २२, रा. उल्हास नगर, ठाणे), राहुल श्याम राऊत (वय १९), राजु गोविंदसिंग चव्हाण (वय १९, रा. दोघेही सुभाषनगर, कामगार कॉलनी), प्रदीप ताराचंद चन्ने (वय २०, रा. पांढराबोडी झोपडपट्टी) या चार आरोपींना दरोडा टाकण्यापूर्वीच अटक केली. त्यांच्या ताब्यातुन तलवार, गुप्ती, २ खंजर, दोरी, मिरची पावडर जप्त केले. (प्रतिनिधी)